यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गडचिरोली येथे आयोजित राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिन महोत्सवात यावल तालुक्यातील कोसगाव येथील लिना संजीव सपकाळे हिने ब्लॉग लेखन स्पर्धेत राज्यात तृतीय क्रमांक पटकावून जळगाव जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या या स्पर्धेत तिने उल्लेखनीय कामगिरी केली. या यशाबद्दल तिला ७० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी संस्कृती, लोककला, रूढी-परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभागाच्या वतीने गडचिरोली येथे राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध सांस्कृतिक आणि सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांमधील स्पर्धकांनी या उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत येणाऱ्या कोसगाव येथील लिना सपकाळे हिने ब्लॉग लेखन स्पर्धेत आपले कौशल्य सिद्ध केले. या स्पर्धेत राज्यभरातून एकूण ५० स्पर्धक सहभागी झाले होते. राज्यस्तरीय गुणांकन समितीने निर्धारित निकषांनुसार सर्व स्पर्धकांच्या लेखनाचे मूल्यमापन केले. त्यानंतर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासह दोन प्रोत्साहनपर पारितोषिकांची निवड करण्यात आली. यात लिना हिने तृतीय क्रमांक मिळवत ७० हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.

या महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. कार्यक्रमस्थळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, पद्मश्री चैत्राम पवार तसेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त निकेश सागर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय जनजातीय कार्यमंत्री जुएल ओराम यांचीही या सोहळ्याला उपस्थिती होती. ग्रामीण आणि आदिवासी भागातील युवक-युवतींमध्ये लेखन, कला आणि सर्जनशीलतेचे विविध गुण दडलेले असतात. त्यांना योग्य व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करू शकतात, हे लिना सपकाळे हिने आपल्या यशातून दाखवून दिले आहे. तिच्या या कामगिरीमुळे यावल प्रकल्प क्षेत्रासह संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा गौरव झाला असून, परिसरातील नवोदित युवक-युवतींनाही प्रेरणा मिळणार आहे.



