जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी संघटनात्मक कार्यक्रम आणि राज्यस्तरीय आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत येत्या २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त ठाणे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’ तथा ‘संविधान रक्षा मार्च’मध्ये जळगाव जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते सहभागी करण्याचा निर्धार करण्यात आला. यासोबतच जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीत जिल्ह्यातील पक्ष संघटनेची सद्यस्थिती, आगामी राजकीय आव्हाने आणि संघटनात्मक बांधणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. फ्रंटल ऑर्गनायझेशन, विविध सेल आणि आघाड्यांच्या नियुक्त्या करण्यासह ब्लॉक अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच ब्लॉक कार्यकारिणी, मंडल आणि सेक्टर अध्यक्षांच्या नियुक्त्या करून गावपातळीवर ग्राम समित्या स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबत चर्चा करण्यात आली. पक्ष संघटना केवळ शहरापुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील प्रत्येक गावात आणि बूथपर्यंत पोहोचविण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पर्यवेक्षक तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी हिम्मत सिंग यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘वोट बचाव, देश बचाव’ मोहिमेच्या अंमलबजावणीचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये ‘वोट रक्षक’ कार्यक्रमांतर्गत वोट रक्षकांची नियुक्ती करणे, सामान्य कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे आणि मतदान प्रक्रियेबाबत जनजागृती करणे या मुद्द्यांवर चर्चा झाली.
याशिवाय २६ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय संविधान रक्षा मार्चच्या तयारीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या मार्चमध्ये जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी व्हावेत, यासाठी पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करण्याचे ठरविण्यात आले. ग्रामीण आणि शहरी भागात ‘वोट बचाओ, देश बचाओ चौपाल’ आयोजित करून नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका आणि विचार पोहोचविण्याचाही निर्णय घेण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उत्तर महाराष्ट्र प्रभारी हिम्मत सिंग यांनी जळगाव जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन केले. संघटनात्मक बांधणी मजबूत करून पक्षाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जळगाव लोकसभा प्रभारी लक्ष्मणराव घुमरे यांनी जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेतला. आगामी काळात बूथ पातळीवर संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीने काम करावे, असा सल्ला त्यांनी दिला. जिल्हा प्रभारी प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी काँग्रेसचे विचार, धोरणे आणि कार्य जिल्ह्यातील घराघरांत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
या बैठकीला प्रदेश सरचिटणीस मुफ्ती हरून नदवी, चाळीसगाव प्रभारी हरीश रावल, पाचोरा प्रभारी भालचंद्र पाटील, माजी प्रदेश सचिव ॲड. सलीम पटेल, ज्योत्स्ना विसपुते, सुभाष पवार, विजय वाणी, जिल्हा सरचिटणीस विजय कासोदे, राहुल बाहेती, बाबा देशमुख, एससी सेल जिल्हाध्यक्ष अंकुश कटारे, ओबीसी जिल्हाध्यक्ष किरण महाजन, प्रभाकर महाजन, जाकिर बागवान, अर्चना गाडे, अरुणा कणखरे, धनगर पाटील, सुभाष पाटील, सुनील पाटील, सुनील सोनार, दिनेश पाटील, मनोज चौधरी, शकील शेख, डॉ. व्ही. डी. पाटील, प्रा. संजय पाटील, पिरान अनुष्ठान, प्रदीप सोनावणे, सुभाष अण्णा पाटील, संदीप कुमावत, राजू भोसले, गोकुळ पाटील, प्रतिभा सोनवणे, बी. के. सूर्यवंशी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कासोदे यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस बाबा देशमुख यांनी केले, तर प्रभाकर महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले.



