यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’चा समारोप १८ नोव्हेंबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल येथे उत्साहात झाला. या सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील आदिवासी गावे आणि पाड्यांवर ८१ विशेष सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, हजारो पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे होते.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या निर्देशानुसार आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या पुढाकाराने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, समृद्ध सांस्कृतिक वारसा, लोककला आणि सामाजिक अस्मिता यांचे जतन व संवर्धन करण्यासोबतच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या सप्ताहात विविध शासकीय योजनांचे लाभ वितरण, आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच विविध शासकीय सेवा-सुविधांचे आयोजन करण्यात आले.

समारोप कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना आमदार अमोल जावळे यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. आदिवासीबहुल भागातील मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करत त्यांनी पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, महिला बचत गटांचे सक्षमीकरण आणि आरोग्य सुविधांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. आदिवासीबहुल भागातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्र्यांनी १२.५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती आमदार जावळे यांनी दिली. या निधीमुळे आदिवासी भागातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महावितरणकडून (MSEB) वीजपुरवठा करणे शक्य नसलेल्या दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून देण्याचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले. ज्या आदिवासी गावांमध्ये आणि पाड्यांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही, तेथे मंजूर निधीतून लवकरच वीजपुरवठा सुरू केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी यावल येथे दोन कोटी रुपये खर्चून ‘बहिणाई मॉल’ अर्थात बचत गट भवन उभारण्यात येत असल्याची माहितीही आमदार जावळे यांनी दिली. महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू, हस्तकला साहित्य, वनोपज आणि खाद्यपदार्थांच्या निर्मिती व विक्रीसाठी या मॉलमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये शिलाई मशीन, आधुनिक किचन तसेच उत्पादनांच्या विक्रीसाठी स्वतंत्र हॉल असणार आहे. त्यामुळे स्थानिक महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होऊन आर्थिक उत्पन्नाचे नवे साधन निर्माण होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनाही आमदार जावळे यांनी महत्त्वाचे आवाहन केले. योजनेचा लाभ नियमितपणे बँक खात्यात जमा होण्यासाठी महिलांनी दरवर्षी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक एकमेकांशी संलग्न असणे तसेच संबंधित कागदपत्रांवरील नावात एकसारखेपणा असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सायबर फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ओटीपी देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
आरोग्य सुविधांच्या दृष्टीने आयुष्मान भारत कार्ड वितरण शंभर टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आमदार जावळे यांनी प्रशासनासमोर ठेवले. आजारपणाच्या किंवा कठीण प्रसंगी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचारांची सुविधा मिळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आयुष्मान भारत कार्ड काढून घ्यावे, असे त्यांनी सांगितले. यासाठी प्रत्येक गावात आणि आदिवासी पाड्यावर विशेष शिबिरे आयोजित करावीत. पुढील दीड ते दोन महिन्यांत शंभर टक्के आयुष्मान भारत कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रकल्प अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला केवळ योजनांची माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाणी, वीज, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून विकासाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार समारोप सोहळ्यात व्यक्त करण्यात आला.



