वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरात पाणीपुरवठ्याची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असून, आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याची नासाडी रोखण्यासाठी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. ते थेट नागरिकांच्या घरोघरी जाऊन हात जोडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन करीत आहेत. नगराध्यक्षांनी स्वतः नागरिकांच्या दारात जाऊन पाणी बचतीची विनंती केल्याने शहरात या उपक्रमाची चर्चा सुरू झाली आहे.
वरणगाव शहरातील काही भागांमध्ये चार दिवसांतून एकदा, तर काही भागांमध्ये तब्बल सात दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे. नागरिकांना सुमारे चार तास पाणीपुरवठा होत असला, तरी अनेक कुटुंबांची पाण्याची गरज एक ते दोन तासांतच पूर्ण होते. मात्र, पाणी भरून झाल्यानंतरही काही ठिकाणी नळ सुरूच राहत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गटारीत किंवा शौचालयात वाहून जात असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरात पाण्याची उपलब्धता मर्यादित असताना अशा प्रकारे होणारी नासाडी रोखणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केवळ प्रशासनाच्या माध्यमातून सूचना देण्याऐवजी स्वतः नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. ते घरोघरी जाऊन नागरिकांना विनम्रपणे पाणी बचतीचे महत्त्व पटवून देत आहेत. घरातील पाणी भरून झाल्यानंतर नळ तातडीने बंद करावा, प्रत्येक नळाला तोटी बसवावी आणि पाणी विनाकारण वाहू देऊ नये, अशी विनंती ते करीत आहेत.

दरम्यान, सध्या दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने वरणगावच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कठोरा जॅकवेल आणि हतनूर धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर मर्यादा येत असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. पाण्याचा साठा आणि उपलब्धतेचा विचार करता आगामी काळात पाणीटंचाई अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी नागरिकांना आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. पाणीपुरवठा ठरावीक वेळेत होत असल्याने नागरिकांनी गरजेपुरतेच पाणी भरावे. पाणी साठवताना त्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी घ्यावी. घरातील नळ, पाईप किंवा जोडण्यांमधून गळती होत असल्यास ती तातडीने दुरुस्त करून घ्यावी, असे आवाहनही या पाणी बचत मोहिमेतून करण्यात येत आहे.
पाणी ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याबरोबरच नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. नगराध्यक्षांना स्वतः घरोघरी जाऊन हात जोडून विनंती करण्याची वेळ आली असताना वरणगावकर या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतात आणि पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी किती जागरूक होतात, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.



