धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने धरणगाव येथे महिलांसाठी मोफत शिवणकाम प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहाचे औचित्य साधून क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतीसंस्था, डॉ. हेडगेवारनगर, धरणगाव संचलित मुकुंदराव पणशीकर कौशल्य विकास प्रशिक्षण व उद्योजकता केंद्रांतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला. मराठे गल्ली, बजरंग चौक येथे झालेल्या या केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला महिला आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या मोफत शिवणकाम प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन महामंडलेश्वर १००८ श्री भगवानदासजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भाईदासजी सोनवणे आणि सचिव विलास पंडित महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे सहसचिव समाधानजी मोरे यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. ‘हात माझ्या कष्टाचा, कौशल्याचा प्रश्न सोडवी रोजगाराचा’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य असून, याच विचारातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या काळात महिलांनी केवळ घरगुती जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित न राहता स्वतःमधील कौशल्य ओळखून विविध क्षेत्रांत पुढे यावे, अशी गरज त्यांनी व्यक्त केली. शिवणकामासारखे उपयुक्त कौशल्य आत्मसात केल्यास महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी निर्माण करता येऊ शकते. तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात भर घालण्याबरोबरच स्वतंत्र ओळख निर्माण करता येईल. याच उद्देशाने प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महामंडलेश्वर १००८ श्री भगवानदासजी महाराज यांनी उपस्थित महिला भगिनींना आशीर्वाद दिले. शिवणकाम प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, कौशल्याचा उपयोग करून स्वावलंबी जीवन जगावे आणि उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या प्रशिक्षण केंद्रामध्ये महिलांना अनुभवी प्रशिक्षकांकडून मोफत शिवणकामाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना शिवणकामाचे कौशल्य आत्मसात करता येणार असून, त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच रोजगाराच्या विविध संधी मिळविण्यासाठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे आर्थिक परिस्थितीमुळे प्रशिक्षण घेता न येणाऱ्या महिलांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे.
या उद्घाटन सोहळ्याला धरणगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा, सन्माननीय नगरसेवक, विविध समाजांचे पंचमंडळी, प्रतिष्ठित नागरिक, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण पाटील यांनी केले, तर हरिषजी माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.



