Home Cities जळगाव जळगावात शिवकालीन युद्धकलेचा जागर! लाठीकाठी, दांडपट्टा अन् तलवारबाजीचे प्रशिक्षण सुरू

जळगावात शिवकालीन युद्धकलेचा जागर! लाठीकाठी, दांडपट्टा अन् तलवारबाजीचे प्रशिक्षण सुरू

0
जळगावात शिवकालीन युद्धकलेचा जागर! लाठीकाठी, दांडपट्टा अन् तलवारबाजीचे प्रशिक्षण सुरू

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिवकालीन शौर्यपरंपरा आणि पारंपरिक युद्धकलेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने बाजीप्रभू तालीम आखाड्याच्या वतीने आयोजित शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे उत्साहात करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून युवक-युवतींना लाठीकाठी, दांडपट्टा आणि तलवारबाजी यांसारख्या पारंपरिक युद्धकलांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

शिवकालीन युद्धकला ही केवळ लढण्याची पद्धत नसून ती शौर्य, साहस, शिस्त आणि स्वसंरक्षणाचे प्रतीक आहे. आधुनिक काळात या पारंपरिक कलांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे आणि त्यांचे जतन व्हावे, या उद्देशाने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या युवक-युवतींना अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध युद्धकलेचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. उद्घाटनप्रसंगी गजानन देशमुख मामा, नगरसेवक पियुष कोल्हे, माजी नगरसेविका लताताई भोईटे, नगरसेवक कल्पेश सोनवणे, शिवसेनेच्या सरिताताई कोल्हे, बंटी भाऊ नेरपगारे, विद्या मुकुंदा सोनवणे, महिला प्रशिक्षक शुभांगीताई सोनवणे, रत्नाताई अत्तरदे, विशाल जगदाळे, विकी भोईटे, सागर महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रशिक्षण शिबिरात लाठीकाठी, दांडपट्टा आणि तलवारबाजी या पारंपरिक युद्धकलांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, महिला प्रशिक्षकांच्या सहभागामुळे मुली आणि महिलांनाही या युद्धकला शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे स्वसंरक्षणासोबतच आत्मविश्वास आणि शारीरिक क्षमता वाढविण्यासही मदत होणार आहे. शिवकालीन युद्धकलेची परंपरा केवळ इतिहासापुरती मर्यादित न राहता ती प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. या शिबिरामुळे जळगावातील युवक-युवतींना पारंपरिक युद्धकलेचे कौशल्य शिकण्याची संधी मिळणार असून, शिवरायांच्या शौर्यपरंपरेचा वारसा जपण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.