जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी जळगावात प्रथमच अनोखा ‘बुक स्ट्रीट’ उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात तब्बल एक लाख विविध भाषांतील पुस्तकांची रस्त्यावर मांडणी करण्यात येणार असून, येथे भेट देणाऱ्या प्रत्येक वाचकाला आवडीचे एक पुस्तक मोफत घेता येणार आहे. व. वा. जिल्हा वाचनालयाच्या १५० व्या वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमातून जळगावच्या सांस्कृतिक आणि वाचन चळवळीच्या इतिहासात नवा अध्याय जोडला जाणार आहे.
व. वा. जिल्हा वाचनालय आणि डोंबिवली येथील पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्रात प्रथमच हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रविवार, १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ ते सकाळी ११ या वेळेत काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानासमोरील रस्त्यावर हा बुक स्ट्रीट रंगणार आहे. यामध्ये विविध विषयांवरील आणि विविध भाषांतील सुमारे एक लाख पुस्तकांची आकर्षक मांडणी केली जाणार आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे येणाऱ्या प्रत्येक वाचकाला एक पुस्तक विनामूल्य घेता येणार आहे. पुस्तकांच्या माध्यमातून वाचनाची आवड निर्माण व्हावी, नव्या पिढीला पुस्तकांशी जोडता यावे आणि समाजात वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत व्हावी, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.

यापूर्वी डोंबिवली, पुणे आणि ठाणे येथे अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर आता जळगावमध्येही हा उपक्रम राबविण्यात येत आहे. व. वा. जिल्हा वाचनालयाच्या दीडशे वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा उत्सव अधिक व्यापक करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी या बुक स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी जळगाव शहर महानगरपालिका, पोलीस विभाग आणि शहर वाहतूक विभागाचे सहकार्य लाभत आहे. नियोजनबद्ध पद्धतीने पुस्तकांची मांडणी आणि नागरिकांची उपस्थिती लक्षात घेऊन आवश्यक व्यवस्था करण्यात येणार आहे.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत वाचनालयाचे कार्याध्यक्ष सी.ए. अनिलकुमार शाह यांनी उपक्रमाची माहिती दिली. यावेळी पै फ्रेंड्स लायब्ररी, डोंबिवलीचे अमेय घेसास, हेमंतकुमार नेहेते, संकेत पै, सिद्धार्थ सामंत, वाचनालयाच्या सचिव प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी, महिला समिती प्रमुख संगीता अट्रॉवलकर आणि ग्रंथपाल अनिल अत्रे उपस्थित होते. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थी, तरुण आणि पुस्तकप्रेमींनी या उपक्रमाला भेट द्यावी, पुस्तकांचा आनंद घ्यावा आणि जळगावच्या वाचन चळवळीचा हा ऐतिहासिक क्षण यशस्वी करावा, असे आवाहन व. वा. जिल्हा वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.