जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने वैद्यकीय क्षेत्रात एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे. कंबरदुखी, पायात पसरणाऱ्या तीव्र वेदना आणि चालणे-बसणेही कठीण करणाऱ्या मणक्याच्या गंभीर आजारावर महादेव रुग्णालयात अत्याधुनिक ‘एंडोस्कोपिक मोनोपोर्टल’ शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारची प्रगत शस्त्रक्रिया पार पडली असून, यामुळे मणक्याच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एका महिला रुग्णाला गेल्या काही काळापासून अत्यंत तीव्र कंबरदुखीचा त्रास होता. ही वेदना त्यांच्या उजव्या पायापर्यंत पसरत होती, ज्यामुळे त्यांना चालणे आणि बसणेही अशक्य झाले होते. पायाला मुंग्या येणे आणि बधिरता जाणवत असल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला होता. विविध उपचारांनंतरही आराम न मिळाल्याने त्या तपासणीसाठी महादेव रुग्णालयात दाखल झाल्या. याठिकाणी रुग्णालयातील न्युरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अतुल जाधव आणि डॉ. विपूल राठोड यांच्या तज्ज्ञ टीमकडून रुग्णाची सखोल तपासणी करण्यात आली. एमआरआय (MRI) अहवालाद्वारे त्यांच्या आजाराचे अचूक निदान झाले आणि डॉक्टरांनी त्यांना एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीचा सल्ला दिला.
पक्षाने दिलेली जबाबदारी आणि रुग्णाची संमती यानंतर १० नोव्हेंबर रोजी ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. एंडोस्कोपिक मोनोपोर्टल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मणक्याच्या प्रभावित भागातील डिस्कचा नसांवर येणारा दाब अत्यंत अचूकपणे आणि कमीत कमी आक्रमक पद्धतीने (Minimally Invasive) दूर करण्यात आला. या शस्त्रक्रियेचे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. त्यांची वर्षानुवर्षांची कंबरदुखी आणि उजव्या पायात पसरणारी रॅडिक्युलर वेदना पूर्णपणे थांबली.
रुग्णाला बसताना किंवा चालताना आता कोणतीही वेदना होत नसल्याने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्णाची प्रकृती समाधानकारक असल्याने शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन दिवसांत, म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मणक्याच्या आजारांवरील या आधुनिक एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानामुळे मोठ्या चिरेविना, रक्तस्त्राव कमी होऊन आणि स्नायूंचे नुकसान न होता उपचार करणे शक्य झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रगत मणक्याच्या उपचार सुविधांमध्ये महादेव रुग्णालयातील या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे एक महत्त्वपूर्ण भर पडली आहे. या ऐतिहासिक शस्त्रक्रियेसाठी डॉ. प्रितम दास, डॉ. श्रृती खंडागळे, शस्त्रक्रिया सहाय्यक आणि परिचारीका वृदांने मोलाचे सहकार्य केले.