जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, आपुलकी आणि माणुसकीचा सण! या सणाचा आनंद समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, या सामाजिक बांधिलकीतून जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी चोपडा तालुक्यातील गौऱ्या पाडा या आदिवासी वस्तीला भेट देत आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी थेट आदिवासी बांधवांमध्ये सहभागी होत त्यांच्याशी संवाद साधला. तसेच, शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध शासकीय दाखल्यांचे वाटपही करण्यात आले. प्रशासनाच्या या अनोख्या उपक्रमामुळे गौऱ्या पाड्यावर दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.
दिवाळीच्या मंगलमय पर्वात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी गौऱ्या पाड्याला आवर्जून भेट दिली. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या सुख-दुःखाची आणि स्थानिक परिस्थितीची माहिती जाणून घेतली. पारंपरिक पद्धतीने पूजन करून दिवाळी उत्सवात सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी थेट आपल्या पाड्यावर आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या भेटीचे विशेष आकर्षण ठरला तो जिल्हाधिकाऱ्यांनी पाड्यावरील बालकांशी साधलेला संवाद. त्यांनी लहान मुलांशी आपुलकीने गप्पा मारल्या, त्यांच्या शिक्षणाविषयी आणि आवडीनिवडींविषयी जाणून घेतले. प्रशासकीय अधिकारी आणि आदिवासी पाड्यावरील बालकांमध्ये निर्माण झालेल्या या संवादामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला.

केवळ दिवाळी साजरी करण्यापुरती ही भेट मर्यादित न ठेवता, प्रशासनाच्या विविध योजनांचा लाभ आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्यावरही भर देण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांना शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या दृष्टीने मदत मिळाली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सण-उत्सव हे केवळ वैयक्तिक आनंदाचे पर्व नसून समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन आनंद साजरा करण्याची संधी असल्याचे सांगितले. सणांचा आनंद एकमेकांसोबत वाटून घेतल्याने सामाजिक आपुलकी, बंधुभाव आणि एकतेची भावना अधिक दृढ होते, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
या उपक्रमातून प्रशासन आणि आदिवासी समाज यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याचा प्रयत्न दिसून आला. विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहोचल्याने शासकीय यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण होण्यास मदत होते. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात प्रशासनाने दाखविलेली ही संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद ठरत आहे. या कार्यक्रमाला जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.