फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कार्तिक महिन्याचे पावित्र्य, पहाटेचा भक्तिमय गजर आणि श्रीराम नामाचा जयघोष अशा मंगलमय वातावरणात फैजपूर येथील पुरातन श्रीराम मंदिरात कार्तिक स्नानानिमित्त काकड आरतीचा धार्मिक सोहळा सुरू आहे. मंदिरात अनेक वर्षांपासून जपली जाणारी ही परंपरा यंदाही उत्साहात सुरू असून, दररोज पहाटे मोठ्या संख्येने भाविक या आरतीमध्ये सहभागी होत आहेत. २६ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या उपक्रमाची २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सांगता होणार आहे.
कार्तिक महिन्यातील धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन श्रीराम मंदिरात दररोज पहाटे ५ ते ७ या वेळेत काकड आरती, भजन आणि विविध धार्मिक विधी पार पडत आहेत. पहाटेच्या शांत वातावरणात होणाऱ्या या आरतीमुळे मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत आहे. भाविकांकडूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नियमितपणे मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत आहेत. या काकड आरतीच्या सांगतेनिमित्त मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत विशेष कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भरत्न श्री भागवताचार्य ह.भ.प. दिनेश महाराज वक्ते (वडाळी, नांदुरा) हे आपल्या कीर्तनातून भाविकांना प्रबोधन करणार आहेत. या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, श्रीराम मंदिरात केवळ कार्तिक महिन्यातील धार्मिक कार्यक्रमच नव्हे, तर वर्षभर विविध भक्तिपर उपक्रम राबविले जातात. गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रत्येक एकादशीला रात्री ८ ते ९ या वेळेत विठ्ठल नामजपाचा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. या माध्यमातून वारकरी संप्रदायातील नामस्मरण, भक्ती आणि अध्यात्माची परंपरा सातत्याने जपली जात आहे. या धार्मिक उपक्रमाला वै. दिगंबर महाराज मठ, पंढरपूर येथील प्रतिनिधींसह श्रीराम मंदिर फैजपूरचे अध्यक्ष ह.भ.प. नरेंद्र नारखेडे, सचिव काशिनाथ वारके, विश्वस्त डॉ. गणेश भारंबे, डॉ. उमेश चौधरी, राजाराम महाजन, दिलीप पाटील, किशोर कोल्हे आणि विणेकरी ह.भ.प. जगन्नाथ महाराज सोनवणे यांची दररोज उपस्थिती असते.
तसेच प्रा. प्रमोद पाटील, डॉ. प्रभाकर बारी, तबलावादक पंकज पाटील, नरेंद्र चौधरी, हिरामण चौधरी गुरुजी, विजय चौधरी, जितेंद्र महाजन, अशोक पाटील, वासुदेव लढे, रामकृष्ण वाघुळदे, हिरेंद्र चौधरी, राजेंद्र मानेकर, राकेश तिवारी, प्रभाकर महाजन, तुळशीराम वाघुळदे यांच्यासह अनेक भाविक या उपक्रमात योगदान देत आहेत. महिलांमध्ये सौ. रोहिणी भारंबे, सुहासिनी चौधरी, मीना कोल्हे, सुरेखा बारी यांच्यासह श्रीराम मंदिर महिला भजनी मंडळातील सर्व महिला भगिनी भक्तिभावाने सहभागी होत आहेत. मंदिराचे पुजारी दीपक पाठक आणि मिलिंद पाठक हे नियमित धार्मिक विधी पार पाडत असून, सेवेकरी मधुकर पाटील आणि राजेंद्र मानेकर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करीत आहेत.