यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील बामणोद गावात भालोदकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गटारीचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेली ही समस्या आता रोजची झाली असून, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
गटारी तुंबल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असून, याच घाण पाण्यातून ग्रामस्थ आणि वाहनधारकांना मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या काळात या सांडपाण्यामुळे अनेकांच्या घरासमोरील रांगोळ्यांवरही पाणी फिरले.
ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी रोज या परिस्थितीकडे पाहत असतानाही गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. केवळ ‘सुंदर गाव, स्वच्छ गाव‘चे फलक लावून गाव स्वच्छ होत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष काम करण्याची गरज असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
या रस्त्यावरून आमदार अमोल जावळे यांचीही ये–जा असते. त्यामुळे त्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन संबंधितांना तातडीने सूचना द्याव्यात आणि गटारींची स्वच्छता करून रस्त्यावरील सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी बामणोद ग्रामस्थांनी केली आहे.