Home Cities चाळीसगाव आयकर विवरणपत्र ठरले कुटुंबासाठी आर्थिक आधार; एसटी महामंडळाला ३८ लाख भरपाईचे आदेश

आयकर विवरणपत्र ठरले कुटुंबासाठी आर्थिक आधार; एसटी महामंडळाला ३८ लाख भरपाईचे आदेश

0
आयकर विवरणपत्र ठरले कुटुंबासाठी आर्थिक आधार; एसटी महामंडळाला ३८ लाख भरपाईचे आदेश

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रस्ता अपघातात मृत्यू झालेल्या चाळीसगाव येथील उद्योगपती सदानंद मधुकर चौधरी यांच्या वारसांना ३८ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने एसटी महामंडळाला दिले आहेत. मृत व्यक्तीने नियमित भरलेल्या आयकर विवरणपत्रातील उत्पन्न हा नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा न्यायाधिकरणाचे सदस्य आर. एन. जोशी यांनी हा निकाल दिला.

 

२१ डिसेंबर २०२४ रोजी धुळे रोडवर एसटी बसने सदानंद चौधरी यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चौधरी यांचा उपचारादरम्यान २४ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चौधरी हे हॉटेल, बिअर बार, लॉजिंग आणि लिकर सेलचा व्यवसाय करत होते. तसेच ते प्रगतशील शेतकरी होते. त्यांच्या विविध व्यवसायांतून मिळणारे उत्पन्न आणि नियमित भरलेला आयकर यासंबंधीची कागदपत्रे त्यांच्या वारसांच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आली. याच आयकर विवरणपत्रातील उत्पन्नाच्या आधारे नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली.

एसटी महामंडळाच्या वतीने मृत व्यक्तीचा निष्काळजीपणा असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, बसचालकाच्या उलटतपासणीत ॲड. महेंद्र सोमा चौधरी यांनी बसचालकाचा निष्काळजीपणा सिद्ध केला. न्यायालयानेही घटनास्थळाची ऑनलाइन पाहणी करून पुराव्यांची शहानिशा केली.

मृताची पत्नी मनीषा चौधरी, मुलगी निकिता, मुलगा भावेश आणि आई यांनी नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला होता. या दाव्यात न्यायालयाने ३८ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली. विशेष म्हणजे, अवघ्या १ वर्ष, ४ महिने आणि ८ दिवसांत या प्रकरणाचा निकाल लागला.

या दाव्यात अर्जदारांतर्फे ॲड. महेंद्र सोमा चौधरी, ॲड. श्रेयस महेंद्र चौधरी, ॲड. हेमंत जाधव आणि ॲड. सुनील चव्हाण यांनी कामकाज पाहिले. तसेच आमदार मंगेश चव्हाण आणि समाजसेवक दिलीप रामराव चौधरी यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सहकार्य केले.