Home Cities जळगाव रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली!

रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली!

0
रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली!

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | दीपावलीच्या मंगलमय पहाटे महात्मा गांधी उद्यानात आयोजित रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’ कार्यक्रम शास्त्रीय संगीत, नाट्यगीत, अभंग आणि भक्तिगीतांच्या सुरेल सादरीकरणाने रंगला. आकाशवाणी जळगाव, स्व. वसंतराव चांदोरकर समिती प्रतिष्ठान आणि कै. नथ्यूशेठ चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ, पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम, महापौर दीपमाला काळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी आमदार सुरेश भोळे, रमेशदादा जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गायक आशिष रानडे, ईश्वरी दसककर-कदडी आणि पूजा दसककर यांनी रामकली, अहिर भैरव आणि यमन रागांवर आधारित रचना, नाट्यगीते, अभंग व भक्तिगीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘तेजो निधी लोहगोल’, ‘राम का गुणगान’, ‘हे शामसुंदर’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘मागे उभा मंगेश’ आणि ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ अशा लोकप्रिय रचनांना रसिकांनी भरभरून दाद दिली. अखेरीस भैरवीने कार्यक्रमाची सुरेल सांगता झाली.

या मैफलीला पं. सुभाष दसककर (संवादिनी), सुजित काळे (तबला), विजय नेवे (सिंथेसायझर) आणि नितेश पाटील (ॲक्टोपॅड) यांनी साथसंगत केली. सर्व कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन दीपिका घैसास यांनी केले.