Home Cities जळगाव जळगावच्या विकासाचा नवा अध्याय! महापौर दीपमाला काळे यांनी २२ कोटी ८६ लाखांच्या...

जळगावच्या विकासाचा नवा अध्याय! महापौर दीपमाला काळे यांनी २२ कोटी ८६ लाखांच्या कामांना दिला हिरवा कंदील

0
6

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महानगरपालिकेच्या महासभेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले आहेत. महापौर दीपमाला मनोज काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महासभेत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान, नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजना आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना (सन २०२६-२७) अंतर्गत २२ कोटी ८६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्ह्याचे नेते तथा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ आणि आमदार राजूमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर दीपमाला काळे यांनी महासभेत या प्रस्तावांना हिरवा कंदील दिला आहे. मंजूर झालेल्या या कामांमुळे शहराचे सुशोभिकरण, मुख्य चौकांचा विकास, मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण व डांबरीकरण, १७ मजली प्रशासकीय इमारतीचे नूतनीकरण आणि बालगंधर्व खुल्या नाट्यगृहाचा कायापालट होणार आहे. याशिवाय नागरी दलित व दलितेत्तर वस्त्यांमध्ये नवीन रस्ते, गटारी, समाज मंदिर, विपश्यना केंद्र व वाचनालयाच्या निर्मितीला मोठा वेग मिळणार असून, दिवाळीनंतर या सर्व कामांच्या निविदा प्रक्रियेला गती दिली जाणार आहे.

या विकास निधीअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून १० कोटी ७६ लाख ३ हजार १८ रुपयांचा निधी खर्च केला जाईल. यामध्ये मनपाच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाच्या नूतनकरणासाठी ३.५० कोटी रुपये, बालगंधर्व खुले नाट्यगृह व लगतच्या बगीच्याच्या नूतनकरणासाठी २.५० कोटी रुपये, तसेच आकाशवाणी चौक व अजिंठा चौफुली विकासासाठी २ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यासोबतच इच्छादेवी चौक सुशोभिकरण, कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिकरण, मनपाच्या सर्व सेवांसाठी ‘एकात्मिक नागरी निरीक्षण व नियंत्रण केंद्र’ (स्मार्ट संनियंत्रण केंद्र) ची स्थापना आणि शहरात कै. धनाजी नाना चौधरी यांच्या पुतळ्याची उभारणी केली जाणार आहे.

नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत २ कोटी ४७ लाख ९४ हजार ५८८ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून प्रभाग क्रमांक १९ मध्ये मेहरुण स्मशानभूमी पूल ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण (७१.९४ लाख रुपये), प्रभाग १५ मध्ये इच्छादेवी चौक ते सुखअमृत अपार्टमेंटपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व आरसीसी गटार (४२ लाख रुपये), प्रभाग ४ मधील जोशीपेठ भागात डांबरीकरण (३० लाख रुपये), प्रभाग ६ मध्ये शाहूनगर जेडीसीसी बँक कॉलनी रस्ता काँक्रीटीकरण (१९ लाख रुपये) तसेच प्रभाग ७ मधील अजय कॉलनी, दिनानाथवाडी, चैतन्य नगर, श्रीनिवास कॉलनी व आंबेडकर उद्यान परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण (८५ लाख रुपये) केले जाणार आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सर्वाधिक म्हणजे ९ कोटी ६२ लाख ४ हजार ५७३ रुपयांचा निधी अनुसूचित जाती प्रभाग क्रमांक १, ३, ४, १० आणि १२ साठी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये प्रभाग १ मधील राजमालती नगर व बहिणाबाई नगरमध्ये गटार व डांबरी रस्ते (६.०५ कोटी रुपये), शिवशंकर कॉलनी (२९.८२ लाख रुपये) व काळे नगरमध्ये काँक्रीट रस्ते (५५.२० लाख रुपये) करण्यात येतील. प्रभाग ३ मध्ये श्रीराम चौक ते चारबत्ती चौक काँक्रीटीकरण (१.८९ कोटी रुपये) पार पडेल. प्रभाग ४ मध्ये ममुराबाद रोड मेहतर कॉलनीलगत समाज मंदिर व वाचनालय (४७.७० लाख रुपये), ममुराबाद रोड रेल्वे पुलापासून भिलपुरा पोलीस चौकीपर्यंत काँक्रीटीकरण (७८.८० लाख रुपये), रामपेठ, कोल्हे वाडा व जोशीपेठ भागात RCC गटार (३७.३५ लाख रुपये) आणि गुरुनानक नगरमध्ये रस्ते काँक्रीटीकरण (२९ लाख रुपये) केले जाईल.

तसेच प्रभाग १० मध्ये प्रतीक्षा भूमी रस्ता (७९.७४ लाख रुपये), नवीन विपश्यना केंद्र (२९.८७ लाख रुपये), असावा नगर, सिद्धिविनायक कॉलनी, खंडेराव नगर, पिंजारीवाडा भागातील रस्ते व हुडको बौद्ध गट क्र. २१९ ओपन स्पेसला वॉल कंपाऊंड उभारले जाणार आहे. प्रभाग १२ मध्ये सिद्धेश्वर नगर व व्यंकटेश कॉलनी रस्ते (१.१० कोटी रुपये), श्रद्धा कॉलनी व नागेश्वर मंदिर परिसर डांबरीकरण (४९.८९ लाख रुपये), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पेव्हर ब्लॉक व बैठक व्यवस्था (९.९७ लाख रुपये), समता नगर येथे RCC गटार, काँक्रीट पाथवे आणि संभाजी नगर स्टॉप ते अशोक कोळी यांच्या घरापर्यंत साईड RCC गटार बांधण्याची महत्त्वपूर्ण कामे केली जाणार आहेत.

 


Protected Content

Play sound