३० सप्टेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशन संचलित विविध आरोग्य शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, अधिष्ठाता आणि मान्यवर उपस्थित होते. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने डॉ. सी. डी. सारंग, डॉ. धनंजय बोरोले, डॉ. निलेश बेंडाळे आणि डॉ. शिरसाठ यांनी सहभाग नोंदविला. तसेच डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ होमिओपॅथीचे प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय तथा संशोधन केंद्राचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉ. विशाखा गणवीर आणि डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य शिवानंद बिरादार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. विद्यानंद आठवले यांनी प्रास्ताविकातून गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या शैक्षणिक आणि आरोग्यविषयक कार्याचा आढावा मांडला. संस्थेच्या विविध आरोग्य शिक्षण महाविद्यालयांमधील अभ्यासक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि अभ्यासक्रमांच्या विस्ताराची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी तसेच वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी फाउंडेशनकडून सुरू असलेल्या प्रयत्नांवरही त्यांनी प्रकाश टाकला.
यावेळी कुलगुरू डॉ. गिते यांनी गोदावरी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. आरोग्य शिक्षण आणि वैद्यकीय सेवा क्षेत्रात संस्थेने उभारलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेच्या विविध महाविद्यालयांशी विद्यापीठाचे असलेले शैक्षणिक संबंध अधिक प्रभावी करण्यासाठी भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. त्यांच्या या आश्वासनामुळे उपस्थित पदाधिकारी आणि मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह परिसरात लावण्यात आलेल्या गोदावरी फाउंडेशनच्या स्वागत फलकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने फाउंडेशनच्या विविध आरोग्य शिक्षण संस्थांमधील समन्वय अधिक दृढ झाला असून, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासोबतचे शैक्षणिक संबंध अधिक बळकट होण्यास चालना मिळाली आहे.
गोदावरी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या भव्य सन्मानाने कुलगुरू डॉ. गिते भारावून गेले. त्यांच्या कौतुकपूर्ण भूमिकेमुळे संस्थेच्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील कार्याला प्रोत्साहन मिळाले असून, भविष्यात विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमधील सहकार्य अधिक व्यापक होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



