Home आरोग्य डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सरदार पटेल यांना अभिवादन

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सरदार पटेल यांना अभिवादन

0
10

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारताचे लोहपुरुष आणि देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या देशाच्या एकीकरणातील ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करून राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेचा संदेश देण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याचा आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा आढावा घेतला. सरदार पटेल हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान नेते आणि कुशल राजकारणी होते. स्वातंत्र्यानंतर देशातील विविध संस्थानांचे एकत्रीकरण करून अखंड आणि मजबूत भारताच्या निर्मितीत त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे आणि दूरदृष्टीमुळे स्वतंत्र भारताच्या एकात्मतेचा पाया भक्कम झाला, असे त्यांनी सांगितले.

भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून सरदार पटेल यांनी देशाच्या एकीकरणासाठी घेतलेले निर्णय ऐतिहासिक ठरले. त्यांची राष्ट्रनिष्ठा, दृढ इच्छाशक्ती आणि देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. आजचा एकसंघ भारत हा त्यांच्या दूरदृष्टीचे आणि अदम्य राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असल्याचे डॉ. सोळंके यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound