Home Cities जळगाव गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थांमध्ये सरदार पटेल जयंती उत्साहात; माजी खासदार डॉ. उल्हास...

गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थांमध्ये सरदार पटेल जयंती उत्साहात; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याकडून लोहपुरुषांना अभिवादन

0
10

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारताचे लोहपुरुष आणि देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गोदावरी फाउंडेशन संचालित विविध शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांमध्ये अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विविध संस्थांमधील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी विभाग प्रमुख अनंत इंगळे, भूषण चौधरी, पंकज राणे, मिलिंद पाटील, नरेंद्र नारखेडे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. उल्हास पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याचा आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा आढावा घेतला.

सरदार पटेल हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते आणि कुशल राजकारणी होते. स्वातंत्र्यानंतर देशातील विविध संस्थानांचे एकत्रीकरण करून एकसंध आणि मजबूत भारत घडविण्यात त्यांनी ऐतिहासिक भूमिका बजावली. भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी देशाच्या एकात्मतेसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या दूरदृष्टी, कणखर नेतृत्व आणि अदम्य राष्ट्रनिष्ठेमुळे आजच्या अखंड भारताचा पाया मजबूत झाला आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

डॉ. उल्हास पाटील विधी व विज्ञान महाविद्यालयातही सरदार पटेल जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नयना झोपे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रदीप महाजन, प्रा. अमोल चौधरी यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी सरदार पटेल यांच्या महान कार्याची तसेच भारताच्या एकीकरणात त्यांनी बजावलेल्या ऐतिहासिक भूमिकेची माहिती उपस्थितांना दिली. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याचबरोबर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयएमआर), डॉ. वर्षा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, सावदा व भुसावळ, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर, कृषी अभियांत्रिकी तसेच अन्न व तंत्रज्ञान विभागातही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.


Protected Content

Play sound