

दसऱ्याच्या दिवशी तसेच त्यानंतरही तारापार परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यापूर्वी या समस्येबाबत निवेदन दिल्यानंतर केवळ दोन दिवस वीजपुरवठा सुरळीत राहिला. त्यानंतर पुन्हा वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे शेतीला वेळेवर पाणी देणे कठीण झाले असून, पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आधीच दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना अनियमित वीजपुरवठ्याचा अतिरिक्त फटका बसत आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठ्यात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील आणि लालचंद पाटील यांनी महावितरणचे संबंधित अधिकारी सोनवणे व जोशी यांच्याकडे वीजपुरवठ्यातील वारंवारच्या व्यत्ययाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली. शेतकऱ्यांना नियमित वीज मिळणे हा त्यांच्या शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांच्या निदर्शनासही प्रश्न
तारापार परिसरातील वीजसमस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन हा प्रश्न पालकमंत्र्यांच्या निदर्शनासही आणून देण्यात आला आहे. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पुढील अर्ध्या तासात वीजपुरवठ्याची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, निर्धारित वेळेत समस्या सुटली नाही, तर पुढील भूमिका ठरवून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला.
शेतकऱ्यांना नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळेपर्यंत या प्रश्नाचा पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे नगराध्यक्ष योगेश पाटील आणि लालचंद पाटील यांनी स्पष्ट केले. वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे शेतीचे नुकसान होऊ नये, यासाठी महावितरणने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या वेळी भादली, कडगाव, जळगाव खुर्द आणि नशिराबाद हद्दीतील तारापार परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने महावितरणच्या नशिराबाद उपविभागीय कार्यालयात उपस्थित होते. आता अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार वीजपुरवठा सुरळीत होतो का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



