चोपडा (प्रतिनिधी) अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी मुंबई येथील विजय जिरावला यांची तर प्रदेश महामंत्रीपदी चोपडा येथील सुशिल टाटिया यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी यांनी पुणे येथे या निवडीची घोषणा केली.
प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून सुनिल चोपडा, नाशिक तर वरिष्ठ उपाध्यक्ष पदी सुमीत बोरा, नाशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक सामाजिक संस्थांची महत्त्वाची पदे, राष्ट्रीय वेजिटेरियन फौंडेशनचे सेक्रेटरी आणि अल्पसंख्याक जैन महासंघाचे खांदेश विभागीय संयोजक म्हणून कार्यरत असलेल्या सुशिल टाटिया यांची प्रदेश महामंत्री पदी निवड जळगाव जिल्हाच नव्हे तर संपूर्ण खांदेश वासीयां साठी भूषणावह असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
अल्पसंख्याकांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी हा महासंघ अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असून केंद्राच्या सर्व योजना प्रदेश स्तरांवर देखील लागू व्हाव्या यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. जैन धर्मीयांना अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यापासून जैन संस्कृती, जीवनशैली, पुरातन व धार्मिक वास्तुंचे जतन करण्यासाठी कायद्याने संरक्षणाची जबाबदारी शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी महासंघाचे प्रयत्न आहेत.
नवनिर्वाचित पदाधिकारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने लवकरच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी व विभागीय पदाधिकाऱ्यांची निवड घोषित करतील अशी माहिती राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी दिली आहे. नवीन पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी अभिनंदन केले आहे.