Home राजकीय जिल्हा बँक निवडणुकीसाठी रावेरमध्ये हालचालींना वेग; मंदार पाटील यांनी घेतला उमेदवारी अर्ज!

जिल्हा बँक निवडणुकीसाठी रावेरमध्ये हालचालींना वेग; मंदार पाटील यांनी घेतला उमेदवारी अर्ज!

0
14


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच रावेर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. तालुक्यातून महायुतीची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, माजी आमदार अरुणदादा पाटील यांचे पुतणे तथा बाजार समितीचे संचालक मंदार पाटील यांनी जळगाव जिल्हा बँकेतून उमेदवारी अर्ज घेतला आहे. भाजपकडून महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुक असल्याने रावेर तालुक्यातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत रावेर तालुक्यातील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली होती. माजी आमदार अरुण पाटील यांचा विजय निश्चित मानला जात असतानाच, ऐनवेळी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे त्यांना एका मताने पराभव स्वीकारावा लागला होता. या निकालाची तालुक्यासह जिल्हाभर चर्चा रंगली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत मागील पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणती रणनीती आखली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील पाच वर्षांत रावेर तालुक्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. माजी आमदार अरुण पाटील आणि मंदार पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या राजकीय पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाटील गटाला भाजपकडून संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही माजी आमदार अरुण पाटील किंवा मंदार पाटील यांचे राजकीय पुनर्वसन अपेक्षेप्रमाणे झाले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक ही पाटील गटासाठी सहकार क्षेत्रातील राजकीय ताकद दाखविण्याची संधी ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

माजी आमदार अरुण पाटील यांची सहकार क्षेत्रातील पकड आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांचे जाळे लक्षात घेता मंदार पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा अधिक जोर धरत आहे. काही राजकीय निरीक्षकांच्या मते, यंदा मंदार पाटील यांना महायुतीकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. काही मतदारांनी त्यांना पाठिंबा दर्शविल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, भाजप आणि महायुतीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसल्याने अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रावेर तालुक्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, मंदार पाटील यांच्या उमेदवारी अर्जामुळे निवडणुकीतील चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण ठरणार आणि पाटील गटाला संधी मिळणार का, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत रावेर तालुक्यातून मंदार पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय चर्चांना वेग आला असून, महायुतीच्या अधिकृत उमेदवारीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound