Home क्राईम ब्रेकिंग : कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; बहिणीच्या पतीला अटक!

ब्रेकिंग : कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; बहिणीच्या पतीला अटक!

0
9


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२६ ऑक्टोबर) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. सनी विनोद डोळे (वय २७, रा. शिवाजीनगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेत आणखी दोघे जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सनी डोळे आणि त्याच्या बहिणीचा पती सुरज नारायण वानखेडे (रा. कंडारी, ता. भुसावळ) यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले. यावेळी संशयित सुरज वानखेडे याने सनीवर धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात सनी गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर जखमी सनीला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. ऐन तारुण्यात सनीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेत सनीची आजी सुमनबाई तायडे यांच्या हातालाही दुखापत झाली आहे. नातवाच्या मृत्यूची बातमी समजताच त्याची आई आणि आजी यांनी रुग्णालयात केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपी सुरज वानखेडे याला अटक केली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कौटुंबिक वादातून घडलेल्या या जीवघेण्या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound