Home क्राईम बीएएमएस प्रवेशाचे आमिष दाखवून ७ लाख २५ हजारांची फसवणूक ; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा...

बीएएमएस प्रवेशाचे आमिष दाखवून ७ लाख २५ हजारांची फसवणूक ; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

0
6


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वैद्यकीय क्षेत्रातील बीएएमएस (BAMS) अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची ७ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार जळगाव शहरात उघडकीस आला आहे. प्रवेशासाठी पैसे घेतल्यानंतर पुण्यातील भारती विद्यापीठाच्या नावाने बनावट ओळखपत्र आणि गुणपत्रिका पाठविल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी जळगावातील रिंगरोडवरील ‘अभिज्योत करिअर फोरम’च्या संस्थापक मनिषा अजय जोशी आणि त्यांचे पती अजय जोशी (रा. ब्रुक बॉन्ड कॉलनी, जळगाव) यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी मोहित रमेशराव येवले (वय ३०, रा. भवानीनगर, नशिराबाद, ता. जि. जळगाव) हे खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे एम. फार्मसीपर्यंत शिक्षण झाले असून, मागील वर्षी झालेल्या नीट (NEET) परीक्षेत त्यांना १३० गुण मिळाले होते. त्यांना बीएएमएस अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असल्याने ते प्रवेश मिळवून देणाऱ्या संस्थेच्या शोधात होते. याचदरम्यान, जळगावातील एका चहाच्या दुकानावर विद्यार्थ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेतून त्यांना रिंगरोडवरील ‘अभिज्योत करिअर फोरम’ची माहिती मिळाली. त्यानुसार, १४ जानेवारी २०२६ रोजी मोहित येवले हे संबंधित कार्यालयात गेले. तेथे त्यांची मनिषा जोशी आणि त्यांचे पती अजय जोशी यांच्याशी भेट झाली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, नीट परीक्षेत मिळालेल्या गुणांवर बीएएमएसला प्रवेश मिळणे कठीण असल्याचे सांगून आरोपींनी डिम्ड युनिव्हर्सिटी किंवा भारती विद्यापीठ, पुणे येथे सुमारे १० लाख रुपयांपर्यंत खर्च करून प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवून फिर्यादीने प्रवेशासाठी पैसे देण्यास सुरुवात केली.

तक्रारीनुसार, आरोपींनी प्रवेशाच्या नावाखाली मोहित येवले यांच्याकडून रोख रक्कम आणि ऑनलाइन माध्यमातून वेळोवेळी एकूण आठ लाख रुपये घेतले. त्यापैकी ७५ हजार रुपये परत करण्यात आले; मात्र उर्वरित ७ लाख २५ हजार रुपये परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. प्रवेश मिळवून देण्याच्या आश्वासनामुळे त्यांनी संबंधित रक्कम दिली होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाला पुढे वेगळे वळण मिळाले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी मोहित येवले यांना व्हॉट्सॲपवर भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेद, पुणे या संस्थेच्या नावाने ओळखपत्र आणि गुणपत्रिका पाठविल्याचा आरोप आहे. मात्र, या कागदपत्रांवरील मजकूर आणि गुणपत्रिकेतील ‘ट्राय सेमिस्टर’सारख्या नोंदींमुळे फिर्यादीला संशय आला. त्यानंतर त्यांनी कागदपत्रांची खात्री केली असता ती बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कागदपत्रे बनावट असल्याचा संशय आल्यानंतर मोहित येवले यांनी आरोपींकडे आपली रक्कम परत मागितली. मात्र, रक्कम परत करण्यासाठी देण्यात आलेले धनादेश वटले नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेणे, बनावट कागदपत्रे पाठविणे आणि पैसे परत न मिळणे या घटनांबाबत त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मोहित येवले यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय माधवराव भांडारकर करीत आहेत. प्रवेशाच्या नावाखाली पैसे घेतल्याच्या आरोपांसह बनावट कागदपत्रे तयार करणे व वापरणे यासंबंधीच्या बाबींचा तपासातून उलगडा होणार आहे.


Protected Content

Play sound