
चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पुण्यातील एमपीएससी आंदोलनातून राज्यभर चर्चेत आलेले विद्यार्थी नेते विवेकानंद पाटील यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाच्या प्रवक्तेपदासाठी अनेक ऑफर्स आल्या, मात्र कुणी लाखो रुपये दिले तरी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रवक्ता होणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी राजकीय पक्षाच्या माध्यमातून नव्हे, तर स्वतःच्या हिमतीवर रस्त्यावर उतरून लढा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात झालेल्या आंदोलनामुळे विवेकानंद पाटील यांचे नाव चर्चेत आले. या आंदोलनानंतर त्यांना राजकीय पक्षांच्या प्रवक्तेपदाच्या ऑफर्स आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, राजकारणात जाण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नसतील, तर राजकारणात येऊ द्या, असे विधान आपण उपरोधाने केले होते. त्याचा अर्थ सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा आहे, असा होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणे, हेच आपले उद्दिष्ट असल्याचे पाटील यांनी नमूद केले. मला जे काही करायचे आहे, ते स्वतःच्या हिमतीवर रस्त्यावर उतरूनच करायचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडले जाण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्रपणे लढण्यावर आपला भर असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. एमपीएससीच्या मागण्यांसाठी करण्यात आलेले आंदोलन सध्या तत्त्वतः स्थगित करण्यात आले आहे. मात्र, शासनाने मागण्यांच्या संदर्भात चुकीची पावले उचलली किंवा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, तर पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही विवेकानंद पाटील यांनी दिला. त्यामुळे शासनाकडून मागण्यांबाबत पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
दिल्लीतील सुरू असलेल्या आंदोलनाबाबतही पाटील यांनी आपली भूमिका मांडली. कोणत्याही लढ्याला पहिल्याच दिवशी यश मिळत नाही. आम्ही ११ दिवस आंदोलन केले, तेव्हा कुठे थोड्याफार प्रमाणात यश मिळाले, असे त्यांनी सांगितले. अद्याप अध्यक्षांचा राजीनामा झालेला नसल्याचे नमूद करत, आपला लढा संविधानाच्या मार्गाने सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील एमपीएससी आंदोलन आणि दिल्लीतील आंदोलन यांच्या मागण्या वेगळ्या आहेत. दोन्ही आंदोलनांची तात्त्विक बैठकही वेगळी असल्याचे पाटील यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रश्न हे आपले कार्यक्षेत्र आहे, तर दिल्लीतील आंदोलन देशपातळीवरील प्रश्नांसाठी सुरू आहे. दोन्ही लढ्यांचे स्वरूप वेगळे असले, तरी दिल्लीतील आंदोलकांना आपल्या पूर्ण शुभेच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



