Home धर्म-समाज पारोळ्यात आज श्री बालाजी महाराजांचे गरुड वाहन ! रात्री ९ वाजता भव्य...

पारोळ्यात आज श्री बालाजी महाराजांचे गरुड वाहन ! रात्री ९ वाजता भव्य मिरवणुकीला प्रारंभ

0
16


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्री बालाजी महाराज संस्थानच्या ब्रह्मोत्सवानिमित्त पारोळा शहरात आज, बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी श्री बालाजी महाराजांच्या गरुड वाहनाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. आश्विन शुद्ध दशमीच्या शुभदिनी रात्री ९ वाजता श्री बालाजी महाराज मंदिरापासून या मिरवणुकीला प्रारंभ होईल. शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणाऱ्या या धार्मिक सोहळ्यामुळे पारोळ्यात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

गरुड वाहन पूजेचे मानकरी म्हणून श्री बालाजी महाराज संस्थानचे विश्वस्त डॉ. नंदकिशोर दत्तात्रय सैंदाणे, डॉ. सूरज राजेंद्र कोठावदे आणि नगरसेवक पंकज राजेंद्र मराठे यांना मान मिळाला आहे. त्यांच्या हस्ते गरुड वाहनाची पूजा करण्यात येणार असून, त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल. ही मिरवणूक श्री बालाजी महाराज मंदिरातून निघून रथ चौक, कासार गल्ली, श्रीराम मंदिर, कोळी गल्ली, बागवान गल्ली, लोहार गल्ली, आझाद चौक, लवण गल्ली, क्रांती चौक, गुजराथी गल्ली, गणपती मंदिर चौक, गांवहोळी चौक, ओतार गल्ली आणि कुंभारवाडा या मार्गाने जाणार आहे. या मार्गावरील नागरिक आणि भाविकांना श्री बालाजी महाराजांच्या गरुड वाहनाचे दर्शन घेता येणार आहे.

गरुड वाहनाच्या दर्शनासाठी दरवर्षी भाविकांमध्ये उत्सुकता असते. ब्रह्मोत्सवातील या धार्मिक सोहळ्याला पारोळा शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत विशेष महत्त्व आहे. मिरवणुकीदरम्यान भाविकांनी सहभागी होऊन श्री बालाजी महाराजांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, गरुड वाहनाची मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता गरुड वाहन मंदिरात परतणार आहे. श्री बालाजी महाराजांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त आयोजित या सोहळ्याची भाविकांना प्रतीक्षा असून, शहरात धार्मिक उत्साहाचे वातावरण राहणार आहे.


Protected Content

Play sound