Home Cities जळगाव वॉर्ड क्रमांक २ मध्ये तुंबलेल्या गटारी, वाढलेले गवत अन् अतिक्रमण ; महापौर...

वॉर्ड क्रमांक २ मध्ये तुंबलेल्या गटारी, वाढलेले गवत अन् अतिक्रमण ; महापौर दीपमाला काळे यांच्याकडून स्वच्छता निरीक्षकांची कानउघाडणी

0
17

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, तुंबलेल्या गटारी, रस्त्यांवर वाढलेले गवत, बांधकामाचे रस्त्यावर पडलेले साहित्य आणि अतिक्रमण यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी वॉर्ड क्रमांक २ मध्ये प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतेचा आढावा घेतला. परिसरातील अस्वच्छता आणि गलथान कारभाराबाबत त्यांनी संबंधित यंत्रणेला सूचना देत स्वच्छता निरीक्षक निकम आणि त्यांच्या पथकाने दैनंदिन कामकाजाचे योग्य नियोजन करून तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, असे निर्देश दिले.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने महापौर दीपमाला काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वॉर्ड क्रमांक २ मधील विविध भागांना भेट देऊन तेथील स्वच्छता व्यवस्था, गटारींची स्थिती, रस्त्यांवरील अडचणी आणि नागरिकांच्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी परिसर उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या संबंधित विभागांनी अधिक जबाबदारीने काम करावे, असे महापौरांनी स्पष्ट केले. वॉर्ड क्रमांक २ मध्ये स्वच्छतेसाठी एकूण ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, सध्या घंटागाडीचा संप सुरू असल्यामुळे कचरा व्यवस्थापनाच्या कामावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. या परिस्थितीत स्वच्छतेची कामे सुरू ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना दोन जेसीबी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरीही परिसरातील काही भागांत स्वच्छतेच्या समस्या कायम असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. अनेक दिवसांपासून तुंबलेल्या गटारी आणि लहान गल्ल्यांमधील अस्वच्छतेबाबत नागरिकांनी महापौरांकडे तक्रारी मांडल्या. या तक्रारींची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

जोगी नगर परिसरातील गटारींवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाचा मुद्दाही पाहणीदरम्यान समोर आला. गटारींवरील अतिक्रमणामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने संबंधित अतिक्रमणे काढण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच बांधकामानंतरचे वेस्ट मटेरियल रस्त्यांवर टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होण्याबरोबरच परिसराच्या स्वच्छतेवरही परिणाम होत आहे. संबंधितांना तातडीने नोटीस बजावून रस्त्यावरील बांधकाम साहित्य हटविण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. वॉर्डातील रस्त्यांच्या कडेला आणि परिसरात वाढलेल्या गवतामुळेही अस्वच्छतेचे चित्र दिसून आले. हे गवत तातडीने काढून परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच, काही ठिकाणी जुन्या पथदिव्यांऐवजी नवीन दिवे बसविण्याची मागणी नागरिकांनी केली. या मागणीची दखल घेत विद्युत विभागाला आवश्यक पाहणी करून नवीन पथदिवे बसविण्याबाबत निर्देश देण्यात आले. रात्रीच्या वेळी नागरिकांना पुरेसा प्रकाश मिळावा आणि परिसरातील सुरक्षितता वाढावी, यासाठी या कामाला महत्त्व देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

पुलाखालील अतिक्रमण आणि अस्वच्छतेबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी साचलेली अस्वच्छता दूर करून परिसराची तातडीने साफसफाई करण्याचे आदेश महापौरांनी संबंधित यंत्रणेला दिले. सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण आणि कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता नियमित देखरेख ठेवावी, अशी सूचनाही करण्यात आली. नागरिकांनी आपल्या घरांना तातडीने ड्रेनेज कनेक्शन घ्यावेत, असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी केले. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नियमानुसार ड्रेनेज व्यवस्था वापरणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. न्यू सीखवाल नगर परिसरातील नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींचेही तातडीने निराकरण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. नागरिकांच्या समस्या केवळ नोंदवून न ठेवता त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही करून त्यांना दिलासा देण्यावर भर देण्यात आला.

स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे नियोजन, कामाचे वाटप आणि प्रत्यक्ष उपस्थिती यावर लक्ष ठेवण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. स्वच्छता निरीक्षक निकम आणि त्यांच्या पथकाने दररोजच्या कामाचे अचूक नियोजन करावे, प्रत्येक भागातील स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करावी आणि तक्रारींचा नियमित आढावा घ्यावा, असे सांगण्यात आले. तसेच, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची खातरजमा करण्यासाठी हजेरी रजिस्टर तपासणीसाठी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. महानगरपालिकेच्या कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी अशा तपासण्या महत्त्वाच्या असल्याचे या वेळी अधोरेखित करण्यात आले. या पाहणी दौऱ्यादरम्यान नगरसेवक विजय बांदल, सागर सोनवणे, पूजा विजय जगताप यांच्यासह शहर अभियंता आर. टी. पाटील, अभियंता जितेंद्र रंधे, आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले आणि विद्युत विभागाचे सुमित पाटील आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनीही परिसरातील विविध समस्यांची माहिती घेत संबंधित विभागांमार्फत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत चर्चा केली.


Protected Content

Play sound