Home Cities जामनेर पहूर येथे १७ ऑक्टोबरला भव्य आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

पहूर येथे १७ ऑक्टोबरला भव्य आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

0
20

यावल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी पहूर येथे भव्य आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता माळी समाज मंगल कार्यालय, पहूर (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे होणाऱ्या या मेळाव्यात आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके राहणार असून, कार्यक्रमाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय पसमान्दा मुस्लिम समाज अभ्यास समितीचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा असलेले इद्रिस मुलतानी, जळगाव जिल्ह्यातील खासदार व आमदार, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर आणि आदिवासी विकास विभाग, नाशिकचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत तडवी-भिल्ल समाजासह संपूर्ण आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण आणि दुर्गम भागातील पात्र लाभार्थ्यांना योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शासकीय योजनांबाबत माहितीचा अभाव, अर्ज प्रक्रियेतील अडचणी आणि आवश्यक कागदपत्रांविषयी असलेला संभ्रम दूर करण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.

मेळाव्यात आदिवासी विकास विभागासह विविध शासकीय विभागांच्या कल्याणकारी योजनांसाठी स्वतंत्र माहिती कक्ष उभारण्यात येणार आहेत. या कक्षांमध्ये शैक्षणिक, आर्थिक, गृहनिर्माण, स्वयंरोजगार आणि इतर विकास योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया तसेच ऑनलाइन अर्ज कसा भरावा, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन मिळणार आहे. या उपक्रमामुळे जामनेर, पहूर आणि परिसरातील आदिवासी समाजातील नागरिकांना विविध योजनांची माहिती मिळविणे सोपे होणार आहे. पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घेता येणार असल्याने शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळविण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. नाशिक विभागातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या तीन मुलांसह तीन मुली, अशा एकूण सहा गुणवंत विद्यार्थ्यांना ‘राघोजी भांगरे विद्यार्थी गुणगौरव’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासोबतच इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.

तसेच पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे पारदर्शक पद्धतीने निवड झालेल्या शिक्षकांना मेळाव्यात अधिकृत सेवा नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या शैक्षणिक व्यवस्थेशी संबंधित महत्त्वाच्या उपक्रमांचाही या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. तडवी-भिल्ल समाजातील बांधव, महिला, युवक, विद्यार्थी आणि विविध शासकीय योजनांसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. योजनांची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे.


Protected Content

Play sound