जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील बारी नगर परिसरात विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकरी विश्वनाथ भिका ताडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १५ ऑक्टोबर) दुपारी घडली. शेतातील नादुरुस्त झालेली मोटार विहिरीतून बाहेर काढत असताना अचानक तोल गेल्याने ते विहिरीत पडल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. या घटनेमुळे शिरसोली परिसरात हळहळ व्यक्त होत असून ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ भिका ताडे हे शिरसोली प्र.न. शिवारातील आपल्या शेतात कामासाठी गेले होते. गुरुवारी दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान ते विहिरीतून नादुरुस्त झालेली पाण्याची मोटार बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. याचवेळी अचानक त्यांचा तोल गेल्याने ते विहिरीत पडले. ही घटना घडताच परिसरात काम करणाऱ्या ग्रामस्थांनी आवाज ऐकून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी तत्परता दाखवत विश्वनाथ ताडे यांना विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

विश्वनाथ ताडे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यापैकी एका मुलीचा विवाह झाला असून दुसरी मुलगी अविवाहित आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या व्यक्तीचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे. या घटनेची आणखी वेदनादायी बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वीच विश्वनाथ ताडे यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या चुलत भावाचाही मृत्यू झाला होता. या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच महिनाभराच्या कालावधीत कुटुंबातील तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने ताडे परिवाराला आणखी मोठा धक्का बसला आहे. एकामागून एक घडलेल्या या दुर्दैवी घटनांमुळे कुटुंबीयांसह शिरसोली गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेबाबत पुढील पोलीस कार्यवाही सुरू आहे.



