अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील मूळ रहिवासी असलेल्या व हल्ली उत्राण ता.एरंडोल येथे राहणाऱ्या तरुण जोडप्याचा तापी नदीत पायांना साखळी लावून कुलूप लावलेल्या अवस्थेत बुडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली आहे.
श्याम हरी पाटील (वय २८) मूळ रा.पाडळसरे ता. अमळनेर (हल्ली मुक्काम उत्राण ता एरंडोल ) आणि त्याची पत्नी सपना वय २० हे ता.८ रोजी दुपारी १२ ते १ च्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील तापी नदीत पायाला लोखंडी साखळी व कुलूप लावलेल्या अवस्थेत तरंगताना आढळून आले. नरडाणा पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन कापडणीस व पथक यांनी घटनास्थळी जाऊन दोघाना बाहेर काढले. पंचनामा करण्यात आला. श्यामचा डावा पाय आणि सपनाचा उजवा पाय साखळीने एकत्र बांधलेला व त्याला मोठे कुलूप लावलेले आढळून आले. पोलिसांनी त्यांचे शव सरकारी रुग्णालयात शव विच्छेदनसाठी नेले.

काही वर्षांपूर्वी श्याम व त्याचा परिवार पाडळसरे गाव सोडून कामासाठी उत्राण येथे गेला होते. मात्र त्याचे आई -वडील परत मूळ गावी आले मात्र त्याठिकाणी श्याम शेती , ट्रॅक्टर चालवणे असे काम करीत होता. तेथे सपना नावाची तरुणी तिच्या बहिणीकडे राहत होती. सपना व श्याम यांची ओळख होऊन प्रेमात रूपांतर झाले होते. दोघांनी गेल्या मे महिन्यात प्रेमविवाह केल्याचे सांगितले जात आहे. तीन चार दिवसांपूर्वी ते बाहेरगावी गेले होते आज अचानक त्यांचे शव नदीत तरंगताना आढळून आल्याने ही आत्महत्या की हत्या याबाबत चर्चेला उत आला होता. या भयंकर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. मयत वडिलांचे निधन झाले असून विधवा आई व लहान भाऊ हे पाडळसरे येथे राहतात.



