Home धर्म-समाज रावेरमध्ये दुर्गोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा ; DYSP अनिल बडगुजर यांचे...

रावेरमध्ये दुर्गोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा ; DYSP अनिल बडगुजर यांचे आवाहन

0
13

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरासह तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुर्गोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी केले. यंदा रावेर शहरात ३६ तर रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ८३ दुर्गोत्सव मंडळांची नोंद झाली असून, उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने रावेर पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना अनिल बडगुजर यांनी सांगितले की, रावेर शहरातील दुर्गोत्सवाची परंपरा शांततेत आणि उत्साहात पुढे नेण्यासाठी सर्व मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे. रावेरमधील नवरात्रोत्सवाचे कौतुक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक करतील, अशा पद्धतीने मंडळांनी नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध उत्सव साजरा करावा, असेही त्यांनी आवाहन केले. उत्सवाच्या काळात प्रत्येक दुर्गोत्सव मंडळाच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष राहणार असून, पोलिसांचे गोपनीय पथकही सतर्क राहणार असल्याचे बडगुजर यांनी स्पष्ट केले. शहरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटकांवर लक्ष ठेवण्यात येणार असून, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळांनी तसेच नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, रावेर शहरात सध्या ३६ दुर्गोत्सव मंडळांची नोंद झाली आहे. तर रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ८३ दुर्गोत्सव मंडळे नोंदणीकृत आहेत. नवरात्रोत्सवात महिला व युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. त्यामुळे महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची विशेष खबरदारी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी घ्यावी, असे बडगुजर यांनी सांगितले.

दरम्यान, शांतता समितीच्या बैठकीत विविध दुर्गोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी उत्सवाच्या नियोजनासंदर्भातील समस्या आणि मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. नवरात्रोत्सवाच्या काळात वीजपुरवठा सुरळीत राहावा आणि उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये वीजखंडित होण्याचे प्रकार टाळावेत, यासाठी महावितरण विभागाने विशेष दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लक्षात घेता महामार्गालगत होणारी मांसविक्री नवरात्रोत्सवाच्या काळात बंद ठेवावी, अशी मागणीही मंडळांच्या प्रतिनिधींनी बैठकीत केली. उत्सव काळात नागरिकांची वाढणारी गर्दी, वाहतूक आणि सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि महावितरणचे अधिकारी निरंजन कोष्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नगरसेवक पद्माकर महाजन, माजी नगराध्यक्ष हरिष गनवानी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, भाजप किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पाटील, नगरसेवक सादिक मेंबर, नगरसेवक राजेंद्र चौधरी, भाजपचे माजी शहराध्यक्ष उमेश महाजन, सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष विशाल अग्रवाल, सचिव अजिंक्य वाणी, सामाजिक कार्यकर्ते निलेश वाणी, डी. डी. वाणी, डॉ. सुरेश पाटील, शैलेश अग्रवाल, महेमुद शेख, वसीम शेख, पंकज वाघ आणि गयास शेख यांच्यासह विविध दुर्गोत्सव मंडळांचे अध्यक्ष, शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी केले. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि दुर्गोत्सव मंडळांमध्ये समन्वय ठेवून उत्सव शांततेत पार पाडण्यावर बैठकीत भर देण्यात आला.


Protected Content

Play sound