Home क्राईम मेहरुण बगीच्यात काळाचा घाला; काँक्रीटच्या गटारीत दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

मेहरुण बगीच्यात काळाचा घाला; काँक्रीटच्या गटारीत दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

0
9

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील मेहरुण बगीचा परिसरात सुरू असलेल्या काँक्रीटच्या गटारीच्या कामादरम्यान दुचाकीचा तोल जाऊन झालेल्या दुर्घटनेत ३५ वर्षीय नवल अर्जुन सोनवणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतातील काम आटोपून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेने रामेश्वर कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नवल सोनवणे हे रामेश्वर कॉलनी, जळगाव येथे पत्नी, आई, मुलगा आणि मुलीसह राहत होते. शेतातील काम आटोपून दुचाकीवरून घरी परतत असताना मेहरुण बगीचा परिसरात सुरू असलेल्या काँक्रीटच्या गटारीच्या कामाजवळ त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. यावेळी दुचाकीसह ते गटारीत पडल्याने गंभीर जखमी झाले.

दुर्घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या आकस्मिक घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नवल सोनवणे हे गेल्या २० वर्षांपासून जळगाव एमआयडीसीतील चटई कंपनीत सेवा बजावत होते. कुटुंबाचा आधार असलेल्या नवल यांच्या अचानक निधनाने पत्नी, आई आणि मुलांवर मोठे संकट ओढवले आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी भाग्यश्री, आई सुंदरबाई, मुलगा दर्शन आणि मुलगी इशू असा परिवार आहे. नवल यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक आणि परिचितांनी रुग्णालयात धाव घेतली. रामेश्वर कॉलनी परिसरातही या घटनेने शोककळा पसरली आहे.

दरम्यान, मेहरुण बगीचा परिसरात सुरू असलेल्या गटारीच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, तसेच नागरिकांच्या वाहतुकीसाठी योग्य खबरदारी घेतली होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.


Protected Content

Play sound