फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अवैध गावठी हातभट्टीची दारू निर्मिती व विक्रीविरोधात फैजपूर पोलिसांनी रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी धडक मोहीम राबवत पाडळसा आणि भालोद येथे कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत तयार गावठी दारूसह कच्चे व पक्के रसायन असा एकूण २४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाडळसा, ता. यावल येथे गावठी हातभट्टीची दारू विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रूपा रामू तायडे याच्यावर छापा टाकला. कारवाईदरम्यान त्याच्याकडून अंदाजे दोन हजार रुपये किमतीची २० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय परदेशी यांच्या फिर्यादीवरून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पाडळसा गावाच्या शिवारातील राजा भोया नाल्याच्या काठी गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईत गणेश रवींद्र कोळी याच्याकडून २०० लिटर गुलमोहर-सागर मिश्रित कच्चे रसायन, २०० लिटर गूळ-नवसागर मिश्रित पक्के रसायन आणि २० लिटर तयार गावठी दारू असा एकूण १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणीही पोलीस कॉन्स्टेबल विजय परदेशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्याच दिवशी फैजपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या पथकाच्या मदतीने भालोद, ता. यावल येथेही कारवाई केली. या कारवाईत बाबू चांदखा तडवी याच्याकडून अंदाजे दोन हजार ५०० रुपये किमतीची २५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल बबन प्रकाश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावठी हातभट्टीच्या दारूची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध लागू कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्याबरोबरच आवश्यकतेनुसार एमपीडीए कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचाही प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या या सलग कारवाईमुळे पाडळसा आणि भालोद परिसरात अवैध गावठी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अवैध हातभट्टी व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याने या व्यवसायात सहभागी असलेल्या व्यक्तींवर आता पोलिसांची करडी नजर राहणार आहे.



