रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केळी पिकाच्या पीकविम्याचे महसूल मंडळ जाहीर करावे, तसेच वादळामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, या मागण्यांसाठी रावेर येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त गांधीजी भजन आंदोलन करण्यात येणार आहे. शासन व प्रशासनाकडून मागण्यांबाबत अद्याप ठोस निर्णय न झाल्याने शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्याचा निर्णय केळी उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे.
गेल्या महिन्यात १५ सप्टेंबर रोजी पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुणे येथील बैठकीचा हवाला देत ३० सप्टेंबरपर्यंत केळी पिकविम्याचे महसूल मंडळ जाहीर करून विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.या आश्वासनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, ३० सप्टेंबरची मुदत उलटूनही महसूल मंडळाबाबत कोणतीही स्पष्ट घोषणा झालेली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, वादळामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मध्य प्रदेशच्या धर्तीवर नुकसानभरपाई देण्याची मागणीही करण्यात आली होती. या संदर्भात नुकसानभरपाईची रक्कम जाहीर करण्यात आली असली तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी किती रक्कम मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी आहे.

केळी पिकाच्या पीकविम्याची मुदत ३१ जुलै रोजी संपली असतानाही आतापर्यंत महसूल मंडळे घोषित करण्यात आलेली नसल्याचा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला आहे. संबंधित महसूल मंडळांची माहिती सार्वजनिक करून शेतकऱ्यांना त्यांच्या पीकविम्याबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यासोबतच पीकविम्याच्या प्रक्रियेत सुमारे १४ हजार शेतकऱ्यांचे कमी दाखविण्यात आलेले क्षेत्र पुन्हा पूर्ववत करावे, अशी प्रमुख मागणी आहे. क्षेत्र पूर्ववत केल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळावी, अशी भूमिका केळी उत्पादकांनी घेतली आहे. या मागण्यांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू असूनही शासनाने अद्याप अपेक्षित कार्यवाही केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर रोजी गांधीजींच्या भजनासह शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाचे लक्ष केळी उत्पादकांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पीकविमा महसूल मंडळांची घोषणा, नुकसानभरपाईची प्रतिहेक्टरी रक्कम स्पष्ट करणे आणि कमी दाखविलेले क्षेत्र पूर्ववत करून त्यानुसार विम्याची रक्कम देणे, या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या आंदोलनात रावेर परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी सुनील कोंडे यांच्यासह अन्य केळी उत्पादक बांधवांनी केले आहे. गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने आणि भजनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.



