Home Cities जळगाव जळगावात माजी सैनिकांच्या स्पर्श पेन्शन व रेकॉर्डच्या अडचणी सुटणार ; २ ऑक्टोबरला...

जळगावात माजी सैनिकांच्या स्पर्श पेन्शन व रेकॉर्डच्या अडचणी सुटणार ; २ ऑक्टोबरला विशेष शिबिराचे आयोजन

0
10

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील माजी सैनिक, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या स्पर्श पेन्शन आणि रेकॉर्ड विषयक विविध अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले असून यामुळे जिल्ह्यातील शेकडो माजी सैनिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

माजी सैनिकांना पेन्शन मिळण्यात येणाऱ्या अडचणी किंवा त्यांच्या सेवा पुस्तकातील नोंदी व रेकॉर्ड विषयक समस्यांचे जागेवरच निराकरण व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी लष्कराची थेट स्पर्श टीम तसेच उत्तर महाराष्ट्र सब एरिया (UM Sub Area) कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी विशेषत्वाने जळगावात उपस्थित राहणार आहेत. हे शिबिर शुक्रवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी ३:३० या वेळेत ‘माजी सैनिक बहुउद्देशीय हॉल’, महाबळ, जळगाव येथे पार पडणार आहे.

या विशेष शिबिरामध्ये स्पर्श पेन्शन प्रणालीशी संबंधित तांत्रिक त्रुटी, पेन्शन सुरू होण्यात येणारे अडथळे, नाव किंवा जन्मतारीख दुरुस्ती तसेच इतर रेकॉर्डविषयक तक्रारींचे थेट निवारण केले जाईल. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीर नारी, वीर माता-पिता आणि आश्रितांनी आपल्या सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांसह दिलेल्या वेळेत महाबळ येथील हॉलमध्ये उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound