Home Cities अमळनेर पितृपक्षात अंगारकी चतुर्थीचा योग; श्री मंगळ ग्रह मंदिरात दर्शनाबाबतचा संभ्रम दूर

पितृपक्षात अंगारकी चतुर्थीचा योग; श्री मंगळ ग्रह मंदिरात दर्शनाबाबतचा संभ्रम दूर

0
15


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यंदा २९ ऑक्टोबर रोजी येणारी अंगारकी चतुर्थी ही पितृपक्षाच्या कालावधीत येत असल्याने भाविकांमध्ये मंदिरात दर्शनाला जावे की नाही, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पितृपक्ष आणि देवदर्शन या दोन परस्परविरोधी गोष्टी नसून कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता भाविकांनी अमळनेर येथील प्रसिद्ध श्री मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी यावे, असे जाहीर आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या आत्मकल्याणासाठी विधी करण्याचा पवित्र काळ मानला जातो. तर दुसरीकडे अंगारकी चतुर्थी ही गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी अत्यंत फलदायी व श्रद्धेची तिथी मानली जाते. धार्मिक शास्त्रानुसार पितरांचे स्मरण करणे आणि मंदिरात जाऊन देवदर्शन घेणे या दोन्ही स्वतंत्र गोष्टी असून त्यांच्यात कोणताही धार्मिक विरोधाभास नाही. त्यामुळे भाविकांनी पितृपक्षाचे कारण सांगून देवदर्शन टाळण्याचे कोणतेही कारण नाही.

अमळनेरचे श्री मंगळ ग्रह मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. प्रत्येक अंगारकी चतुर्थीला येथे हजारो भाविक नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी हजेरी लावतात. यंदा ही चतुर्थी पितृपक्षात आल्याने काही रूढ समजुतींमुळे भाविक दर्शनाला येण्याचे टाळतील अशी शक्यता होती. परंतु श्रद्धा ही भीतीवर नव्हे तर सद्भावना आणि चांगल्या विचारांवर आधारित असावी, असा विचार या निमित्ताने मांडण्यात आला आहे. पितृपक्षात पूर्वजांच्या नावाने दानधर्म, अन्नदान अथवा श्राद्ध विधी करून मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्यात कोणताही धार्मिक अडसर नाही. प्रत्येक कुटुंबातील वैयक्तिक परंपरा आणि श्रद्धांचा आदर राखत भाविकांनी विवेकाने धार्मिक आचरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अंधश्रद्धेला थारा न देता श्रद्धेला विवेकाची जोड देऊन पूर्वजांचे स्मरण आणि देवदर्शन दोन्ही एकाच वेळी साधता येते.


Protected Content

Play sound