


मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोविंद विष्णू महाजन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रमोदकुमार कपले यांनी राज्यशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली असून त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या मानवविद्याशाखेअंतर्गत राज्यशास्त्र विषयासाठी त्यांनी “महाराष्ट्र राज्य विधानसभा सभागृहाच्या अधिवेशन काळातील विविध अधिकाऱ्यांच्या कार्याचा व भूमिकेचा चिकित्सक अभ्यास (२००९–२०१९)” या विषयावर संशोधन केले.
प्रा. कपले यांनी अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रात संशोधन कार्य पूर्ण केले. संशोधनाच्या अंतिम टप्प्यात आयोजित ओपन डिफेन्स कार्यक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर विद्यापीठाकडून त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
यावेळी संशोधन केंद्राचे मार्गदर्शक डॉ. श्रीराम येरेकर, अभ्यास केंद्र समन्वयक डॉ. नामदेव ढाले, राज्यशास्त्र विभागाचे प्रा. जे. जे. जाधव यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रा. प्रमोद कपले यांच्या या यशामुळे गोविंद विष्णू महाजन कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे. त्यांच्या संशोधन कार्याबद्दल सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
संशोधन, अध्यापन आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



