Home Cities अमळनेर अमळनेरात श्री मंगळ जन्मोत्सवात महाभोमयाग, पालखी अन् महाधूपारतीचा भव्य सोहळा !

अमळनेरात श्री मंगळ जन्मोत्सवात महाभोमयाग, पालखी अन् महाधूपारतीचा भव्य सोहळा !

0
17


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील प्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळ जन्मोत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध धार्मिक विधी, ध्वजपूजन, महाआरती, ५६ भोगांचा नैवेद्य, महाभोमयाग, पालखी मिरवणूक आणि महाधूपारती अशा भरगच्च धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल येथे पाहायला मिळाली. या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात भाविकांचा अक्षरशः महासागर उसळला होता.

पहाटेपासूनच मंदिर परिसरात शंखनाद आणि मंगलध्वनीने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. फुलांनी अतिशय आकर्षकपणे सजवलेल्या पाळण्यात श्री मंगळग्रह देवांचा प्रतिकात्मक जन्मोत्सव पार पडला. यानंतर उपस्थितांनी सामूहिकरित्या देवाचा पाळणा गायला. सकाळी विधिवत ध्वजपूजन करून मंदिराच्या कळसावरील व मुख्य प्रवेशद्वारावरील जुने ध्वज उतरवून नवीन ध्वज फडकवण्यात आले, ज्यास मंदिराच्या माजी सैनिक सुरक्षारक्षकांनी मानवंदना दिली. यानंतर झालेल्या भव्य महाआरतीप्रसंगी संभाजीनगर येथील किशोर व श्रीकांत उपाध्याय बंधूंनी देवाला ५६ भोगांचा महाप्रसाद अर्पण केला. या प्रसंगी प्रांताधिकारी मयूर मंगळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व हजारो भाविक उपस्थित होते.
जन्मोत्सवानिमित्त मंदिराच्या ओट्यावर देशी-विदेशी फुलांची आकर्षक ‘मयूरपंखी’ सजावट करण्यात आली होती. ऑर्किड, गुलाब, जरबेरा, लिली व ट्युलिप अशा अनेकविध फुलांनी सजलेला परिसर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. याशिवाय यंदाच्या जन्मोत्सवात अमळनेर येथील निर्गुण फूल भांडारचे संचालक वाल्मिक पाटील यांच्यातर्फे ५६ प्रकारच्या देशी-विदेशी फळांचा विशेष नैवेद्य अर्पण करण्याचा नवा उपक्रम सुरू करण्यात आला. दुपारी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी आयोजित श्री महाभोमयागात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लता सोनवणे आणि तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांनी सहभाग नोंदवला.
सायंकाळी वाद्यवृंदाच्या गजरात व राजदंडाच्या उपस्थितीत श्री मंगळग्रह देवांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या महाधूपारतीने या जन्मोत्सव सोहळ्याची मंगलमय सांगता झाली. या सर्व धार्मिक विधींचे सोशल मीडियावरून थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने देश-विदेशातील हजारो भाविकांना घरबसल्या दर्शनाचा लाभ घेता आला, तसेच उपस्थित भाविकांना मोतीचूर लाडूचा प्रसाद वितरित करण्यात आला.
अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात विविध धार्मिक विधी, महाभोमयाग, ५६ भोग नैवेद्य आणि भव्य पालखी मिरवणुकीसह श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Protected Content

Play sound