


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील नवीन बसस्थानक परिसरात दिवसाढवळ्या प्रवाशाच्या हाताला झटका मारून रक्कम बळजबरीने हिसकावून पळून गेलेल्या सराईत भामट्याला अटक करण्यात जिल्हापेठ पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून १६ हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली असून त्याच्यावर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये ६ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
नवीन बसस्थानक परिसरात १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास एक प्रवासी उभा असताना, अज्ञात चोरट्याने त्याच्या हातातील २१ हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी पीडित प्रवाशाने १९ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजि. क्र. ३१५/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तात्काळ तपासाचे चक्रे फिरवत सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.
तपास पथकाने तातडीने बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारीक पाहणी केली आणि आपल्या गोपनीय खबऱ्यांचे जाळे सक्रिय केले. यादरम्यान संशयित आरोपी नवीन बसस्थानकाजवळील भजी गल्ली परिसरात घुटमळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पथकाने भजी गल्लीत सापळा रचून संशयित भिकन पंडीत शर्मा (वय ६०, रा. तलाव गल्ली, पारोळा) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने जबरी चोरीची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून चोरी गेलेल्या रकमेपैकी १६ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेला आरोपी भिकन शर्मा हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात २, पारोळा पोलीस ठाण्यात ३ आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यात १ असे फसवणूक, तोतयागिरी आणि जबरी चोरीचे एकूण ६ गुन्हे आधीच दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलीस अंमलदार महेश महाजन, नरेश सोनवणे, तेजस मराठे, दीपक पाटील, प्रवीण जाधव, समाधान पाटील, प्रशांत लाड, कमलाकर बडगुजर आणि अजय अहिरे यांच्या पथकाने केली.



