Home Cities अमळनेर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांचा रूट मार्च

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांचा रूट मार्च

0
16


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सव तसेच अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती स्पष्टपणे दिसून यावी, या उद्देशाने बुधवारी (२३ सप्टेंबर) पोलिस प्रशासनातर्फे रूट मार्च काढण्यात आला. शहरातील प्रमुख बाजारपेठा, चौक आणि संवेदनशील भागांतून हा रूट मार्च काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी, अंमलदार आणि होमगार्ड सहभागी झाले होते.

२३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत हा रूट मार्च पार पडला. चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या उपस्थितीत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवातील विविध कार्यक्रम तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने शहरातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. रूट मार्चदरम्यान पोलिस पथकाने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, मुख्य बाजारपेठ, तिरंगा चौक, पवन चौक, मंगलादेवी चौक, झामी चौक, आखाडा मकान, कसाली डीपी, वाडी चौक, पानखिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, पाचकंदील चौक आणि गांधलीपुरा पोलिस चौकी परिसरातून मार्गक्रमण केले. शहरातील गर्दीची ठिकाणे तसेच संवेदनशील भागांचा रूट मार्चमध्ये समावेश करण्यात आला. या रूट मार्चसाठी एकूण ९ पोलिस अधिकारी आणि ९५ पोलिस अंमलदार सहभागी झाले होते. त्याचबरोबर एक आरसीपी पथक, एक स्ट्रायकिंग फोर्स तसेच ११८ होमगार्डचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोठ्या संख्येने पोलिस आणि गृहरक्षक दलाची उपस्थिती असल्याने शहरातील सुरक्षाव्यवस्थेचे नियोजन प्रभावीपणे करण्यात आले.

गणेशोत्सव आणि अनंत चतुर्दशीच्या काळात शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असते. गणेश विसर्जन मिरवणुका, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक शांतता यांचा विचार करून पोलिस प्रशासनाकडून संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष देण्यात येत आहे. रूट मार्चच्या माध्यमातून पोलिस दलाची सज्जता नागरिकांसमोर आणण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाची तयारी अधोरेखित झाली. दरम्यान, गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या काळात नागरिकांनी शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवावा, पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.


Protected Content

Play sound