


निंभोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । निंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खिर्डी गावात घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपींच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पाच आरोपींना अटक करून तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल केली. या कारवाईत तिन्ही गुन्ह्यांमधील एकूण ६ लाख १६ हजार ८१० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रकमेचा समावेश आहे.
निंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खिर्डी येथे राहणाऱ्या शेहनाज शेख अख्तर या १३ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेल्या होत्या. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ३२ हजार ८१० रुपये किमतीचा ऐवज चोरी केला होता. या प्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घरफोडीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निंभोरा पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांना गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपींचा माग काढला. एका आरोपीला मुंबई येथून, तर अन्य चार आरोपींना खिर्डी, ता. रावेर येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर नवाज शेख शरीफ (वय २३), अशपाक ऊर्फ अट्ट्या शेख रमजान (वय ३२), शहादत बैग रफिक बैग (वय २२), चेतन लिलाधर जाधव (वय २९) आणि शाकीब बेग साबीर बैग (वय ३२), सर्व रा. खिर्डी खुर्द, ता. रावेर, यांना अटक करण्यात आली.
तपास पथकाने नवाज शेख याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस कोठडीदरम्यान त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा शहादत बैग, अशपाक ऊर्फ अट्ट्या शेख आणि शाकीब बैग यांच्या साथीने केल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांचे पथक मुंबई येथे रवाना झाले आणि शहादत बैग याला तेथून ताब्यात घेतले. तर अशपाक ऊर्फ अट्ट्या आणि शाकीब बैग यांना खिर्डी येथून ताब्यात घेण्यात आले. अटक केलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ५ लाख ७९ हजार ३१० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. यामध्ये सोन्याची पोत, कानातील झुमके, अंगठ्या तसेच चांदीचे फुलतोडे, गुजऱ्या, बांगड्या आणि हातातील कडे आदी दागिन्यांचा समावेश आहे.
आरोपींची अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता खिर्डी गावात याच गुन्ह्याव्यतिरिक्त आणखी दोन ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती तपासात समोर आली. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये चेतन जाधव याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली. या दोन घरफोडीच्या गुन्ह्यांमधून चोरीस गेलेल्या एकूण १ लाख ७७ हजार ४०० रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांपैकी ३७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. या जप्त मुद्देमालामध्ये सोन्याच्या बाळ्या तसेच चांदीच्या लक्ष्मी, शारदा, बालगोपाळ आणि गणेशाच्या मूर्तींचा समावेश आहे. अशाप्रकारे निंभोरा पोलिसांनी तपासादरम्यान तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करत आरोपींकडून एकूण ६ लाख १६ हजार ८१० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई जळगावचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निंभोरा पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक ए. एम. ढाकणे, ममता आर. तडवी तसेच पोलिस तपास पथकातील पोहेकॉ रिजवान पिंजारी, पोहेकॉ अविनाश पाटील, पोकॉ सुभाष शिंदे, पोकॉ परेश सोनवणे, पोकॉ किरण जाधव, पोकॉ सर्फराज तडवी आणि इतर पोलिस अंमलदारांनी ही कारवाई केली.



