Home Cities जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला १२ नव्या ‘बोलेरो निओ’ ; गस्त आणि आपत्कालीन प्रतिसादाला...

पोलीस दलाच्या दिमतीला १२ नव्या ‘बोलेरो निओ’ ; गस्त आणि आपत्कालीन प्रतिसादाला मिळणार वेग

0
34


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेचे दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी १२ नवीन महिंद्रा बोलेरो निओ वाहनांचा पोलीस दलात समावेश करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या वाहनांचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सोमवारी (२१ सप्टेंबर) जळगाव पोलिस आयुक्तालयाच्या आवारात करण्यात आले.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, रेल्वे पोलिस निरीक्षक प्रशांत सुगरवार, राहुल गायकवाड, मोटार परिवहन विभाग अधिकारी प्रवीण तायडे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नव्या वाहनांमुळे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांची नियमित गस्त, बंदोबस्त आणि आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी पोहोचण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. विशेषतः सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही वाहने उपयुक्त ठरणार आहेत. सन २०२६-२७ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागासाठी एकूण १४ नवीन चारचाकी वाहनांना १ कोटी ४४ लाख २९ हजार २७८ रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी जळगाव पोलीस विभागासाठी १०, तर चाळीसगाव आणि भुसावळ लोहमार्ग पोलिसांसाठी प्रत्येकी एक अशा १२ वाहनांचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. या १२ वाहनांची प्रत्यक्ष खरेदी किंमत १ कोटी १६ लाख १६ हजार रुपये आहे. उर्वरित दोन वाहने बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकासाठी देण्यात येणार आहेत.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दलाकडे सक्षम मनुष्यबळासोबतच पुरेशी वाहने आणि आधुनिक साधनसामग्री असणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून पोलीस विभागाच्या गरजांना सातत्याने प्राधान्य देत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नव्या वाहनांमुळे पोलिसांची गस्त अधिक प्रभावी होऊन नागरिकांच्या मदतीच्या हाकेला जलद प्रतिसाद देता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेवर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी आहे. सण-उत्सव शांततेत आणि आनंदात पार पडावेत यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या कामकाजासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही जबाबदारी असून, पोलीस दलाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या चार ते पाच वर्षांत जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाच्या वाहन व्यवस्थेच्या बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. या कालावधीत ११३ चारचाकी आणि १८८ दुचाकी अशी एकूण ३०१ वाहने पोलीस विभागासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या वाहनांसाठी एकूण ११ कोटी ५२ लाख ३१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस ठाणे आणि विविध शाखांच्या क्षेत्रीय कामकाजासाठी वाहनांची उपलब्धता वाढली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार आणि पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्र लक्षात घेता वाहनांची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. नव्या वाहनांमुळे पेट्रोलिंग, बंदोबस्त तसेच तातडीच्या घटनांना प्रतिसाद देण्याची क्षमता वाढणार आहे. विशेषतः सण-उत्सवांच्या काळात ही वाहने पोलीस यंत्रणेसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस दलाच्या गरजांना प्रतिसाद देत वाहनांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.


Protected Content

Play sound