


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून विविध भागांत बिबट्या आढळल्याच्या घटना आणि चर्चांमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नंदगाव शिवारात व्यक्तीवर हल्ला झाल्याची घटना, शेतशिवारात आढळलेल्या पाऊलखुणा तसेच अंतुर्ली, ढेकू रस्ता, पिळोदा, धुपी आणि देवळी परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी वन विभागाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली असून, नागरिकांनी घाबरून न जाता अधिक सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.
नंदगाव शिवारात बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर परिसरातील शेतशिवारात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्याचे सांगण्यात येत आहे. अंतुर्ली परिसरात रात्रीच्या वेळी डोळे चमकणारा प्राणी दिसल्याची चर्चा सुरू झाली आहे. ढेकू रस्त्यावर बकऱ्या चारणाऱ्या व्यक्तीलाही बिबट्या दिसल्याची वार्ता पसरल्याने या परिसरातील नागरिकांमध्येही सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पिळोदा, धुपी आणि देवळी शिवारातही बिबट्याचा वावर असल्याच्या बातम्या समोर आल्या. एका ठिकाणी बिबट्या पपईच्या शेतात लपल्याचे आणि त्यानंतर तेथून निघून गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तो मक्याच्या शेतात दिसल्याची माहिती परिसरात पसरली. या घटनांमुळे शेतकरी तसेच शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनांची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित भागात तातडीने दाखल होत पाहणी केली. संभाव्य बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी परिसराची पाहणी करण्यात येत असून, नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी वन अधिकारी छत्रपती चव्हाण यांच्याशी संपर्क साधून तालुक्यातील परिस्थितीची माहिती घेतली. बिबट्याच्या वावराबाबत अधिक दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी वन विभागाला केल्या आहेत. तसेच वन विभागाच्या पथकाने गस्त वाढवून संभाव्य ठिकाणी लक्ष ठेवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आमदार अनिल पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, अमळनेर तालुक्यात बिबट्या आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी या बाबीकडे केवळ अफवा म्हणून दुर्लक्ष करून बेसावध राहू नये; मात्र विनाकारण घाबरून जाण्याचीही गरज नाही. विशेषतः शेतकरी बांधवांनी रात्री-अपरात्री एकट्याने शेतात जाणे टाळावे. आवश्यक असल्यास दोन-तीन जणांनी एकत्रितपणे शेतात जावे आणि सोबत बॅटरी व काठी ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
लहान मुलांना एकटे शेतात किंवा घराबाहेर सोडू नये, तसेच स्वतःच्या सुरक्षेसोबत पाळीव व इतर जनावरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे. रात्रीच्या वेळी शेत परिसरात अनावश्यक वावर टाळणे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास स्वतःहून त्या ठिकाणी जाण्याऐवजी संबंधित यंत्रणेला माहिती देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वन विभागाने तालुक्यात दोन ठिकाणी पिंजरे लावले असून त्यामध्ये सावज म्हणून बकरी ठेवण्यात आली आहे. मात्र रात्री-अपरात्री शेतरस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांची वर्दळ आणि आवाज यामुळे बिबट्या पिंजऱ्याच्या परिसरात येत नसावा, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
“मी स्वतः वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. वन विभागाचे पथक गस्त घालत आहे. बिबट्याचा वावर असल्याचे निश्चित झाल्यास त्याला लवकरात लवकर जेरबंद करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले जातील,” असे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.
तसेच नागरिकांनी बिबट्याच्या वावराबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. काही संशयास्पद प्राणी किंवा हालचाल आढळल्यास स्वतःहून पाठलाग न करता तातडीने वन विभागाला किंवा आपल्या कार्यालयाला माहिती द्यावी, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे.
अमळनेर तालुक्यातील विविध गावांच्या शिवारात बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर वन विभागाकडून गस्त आणि पाहणी सुरू असून, नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगणे आणि वन विभागाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.



