Home क्राईम पाचोऱ्यात वाळूमाफियांविरोधात प्रशासनाची आक्रमक मोहीम ; ३ कोटी ६० लाखांचा मुद्देमाल जप्त,...

पाचोऱ्यात वाळूमाफियांविरोधात प्रशासनाची आक्रमक मोहीम ; ३ कोटी ६० लाखांचा मुद्देमाल जप्त, २७ वाहने ताब्यात

0
16


पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गिरणा नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशाविरोधात महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई करत वाळूमाफियांचे धाबे दणाणून सोडले आहेत. शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी भल्या पहाटे ४ वाजेपासून सुरू केलेल्या या अचानक छाप्यात प्रशासनाने १ जेसीबी, ८ डंपर, १६ ट्रॅक्टर आणि पाण्यातून वाळू बाहेर काढणारी २ विशेष अवजारे असा तब्बल ३ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तालुक्यातील कुरंगी, परधाडे, दुसखेडा, माहेजी, वरसाडे, डोकलखेडा व दहिगाव संत परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून सातत्याने केल्या जात होत्या. या बेकायदेशीर उत्खननामुळे गिरणा नदीपात्राच्या नैसर्गिक रचनेला मोठा फटका बसत होता. नागरिकांच्या या तीव्र नाराजीची दखल घेत महसूल, पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन (RTO) विभागाच्या सुमारे १०० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भक्कम फौजफाट्याने पहाटेच या संपूर्ण परिसरात एकाच वेळी अचानक धाडी टाकल्या. अचानक झालेल्या या धाडसी कारवाईमुळे घटनास्थळावरील वाळूमाफियांची मोठी धांदल उडाली.

या धडक कारवाईत घटनास्थळावरून १६ ट्रॅक्टर, ८ डंपर, १ जेसीबी तसेच पात्रातील पाण्यातून वाळू उपशासाठी वापरली जाणारी २ ‘किनी’ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच सुमारे ८० ब्रास अवैध वाळूच्या साठ्याचा पंचनामा करण्यात आला. जप्त करण्यात आलेली सर्व वाहने जागेवर पंचनामा करून सुरक्षिततेसाठी पाचोरा येथील एम.आय.डी.सी. गोडाऊन येथे जमा करण्यात आली आहेत. या अवैध व्यवसायातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात असल्याने, दोषींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

ही भव्य व यशस्वी कारवाई उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, मोटार निरीक्षक अभिजित खरे, नांद्रा मंडळ अधिकारी वैशाली पाटील, नगरदेवळा मंडळ अधिकारी राहुल पवार, कुऱ्हाड मंडळाधिकारी भरत नन्नवरे, पाचोरा मंडळ अधिकारी आर. डी. पाटील यांच्यासह भडगाव व पाचोरा महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी, पोलीस अंमलदार व कोतवाल यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली.


Protected Content

Play sound