चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील २२ खेड्यांचा सिंचन, पिण्याच्या पाणी प्रश्न असलेल्या मन्याड धरणाची उंची वाढवावी तसेच अनेक वर्षांपासुन प्रलंबीत असलेली नारपार योजना मार्गी लावावी, या मागण्यासाठी शेतकरी, ग्रामस्थ हे गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. या शेतकरी बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी युवानेते मंगेश चव्हाण यांनी भेट घेतली. त्यानंतर प्रकल्प योजनेचे राज्याचे तांत्रिक सल्लागार व्ही. डी. पाटील यांच्याशी संपर्क साधून प्रलंबित असलेल्या शेतकरी व ग्रामस्थांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करू, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले.
या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या
तालुक्यातील २२ खेड्यांचा पिण्याचे पाणी व सिंचनाचे जनजिवन मन्याड धरणावर अवलंबुन आहे. मात्र त्याची उंची कमी असल्याने पाणीसाठा कमी होतो. त्या धरणाची उंची वाढल्यास त्याचा फायदा २२ खेड्यांना होणार आहे. मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली येईल व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल तसेच अनेक वर्षांपासुन नारपार योजना प्रलंबीत आहे. याबाबत माजी आमदार राजीव देशमुख तसेच आमदार उन्मेश पाटील यांनी ही योजना मार्गी लावण्यासाठी विधानसभेत पाठपुरावा देखील केला होता. मात्र ही योजना अद्याप प्रलंबीत आहे.
मन्याड धरणाची उंची वाढवुन प्रलंबीत असलेली नारपार योजना मार्गी लावावी यासाठी वेळोवेळी संबंधीत २२ खेड्यातील शेतकरी ग्रामस्थांनी प्रांताधिकारी, पाटबंधारे उपविभाग, तहसिल कार्यालय चाळीसगाव, खासदार व मुख्यमंत्री यांना निवेदन देवुन मागणी केली होती व मागणी मान्य न झाल्यास ५ ऑगस्ट रोजी चाळीसगाव तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोसणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. पण मागण्या मान्य झाल्या नव्हत्या. या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले होते.
उपोषणात यांचा सहभाग
तमगव्हाणचे माजी सरपंच किशोर पाटील, तमगव्हानचे जगदीश पाटील, धनराज पाटील, निलेश पाटील, मुकुंदा पाटील, राजेंद्र पाटील, माळशेवगेचे दिपक पाटील, सिताराम पाटील, संदीप पाटील, शेवरीचे जितेंद्र चौधरी, देवळीचे छगन जाधव, तांबोळेचे डी.ओ.पाटील, संजय पाटील यांच्यासह २२ खेड्यातील शेतकरी, ग्रामस्थ चाळीसगाव तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते.