


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी संचलित बाल संस्कार बालवाडी, बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात यंदाचा ४९ वा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला. सोमवार, दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी श्री गणरायांच्या आगमनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
अशोक प्रभाकर गडे यांच्या घरापासून निघालेली मिरवणूक वाणी गल्ली, बारी चौक, गवत बाजार, वाचनालय मार्गे शाळेत पोहोचली. विद्यार्थ्यांनी ध्वज पथक, लेझीम, झांज, दांडिया तसेच ढोल-ताशांच्या गजरात उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेतील बाल कलाकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा, शिस्त आणि सामाजिक एकात्मतेची भावना रुजविण्यासाठी विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
संस्थाध्यक्ष महेश वाणी, मुख्याध्यापक सुनील माळी, अतुल गर्गे, शरयू कवडीवाले, उत्सव प्रमुख संजय चौधरी, कल्याण लोंढे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधींनी गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.



