


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दहिगाव येथील प्रमुख चौकातील स्वराज्य सेतू सुविधा केंद्राचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना १४ सप्टेंबरच्या रात्री घडली. याप्रकरणी केंद्राचे संचालक सुदर्शन अभिमन्यू पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री विठ्ठल-रुक्माई मंदिरासमोरील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या व्यापार संकुलात हे सेतू सुविधा केंद्र आहे. चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कडी-कोंडे कापून आत प्रवेश केला आणि ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
दरम्यान, दहिगावच्या प्रमुख चौकात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील आठवड्यात एका पानटपरीतून ६६ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली होती. तसेच आणखी दोन दुकाने फोडण्यात आली होती. वाढीव वस्ती परिसरातही चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे व्यापारी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दहिगाव येथे पोलीस दूरक्षेत्राची चौकी असली तरी तेथे स्थानिक पोलीस कर्मचारी उपलब्ध नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. परिसरात रात्रीची गस्त वाढवून चोऱ्यांना आळा घालावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिगाव क्षेत्रातील पोलीस कर्मचारी करीत आहेत.



