


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी विशेष मेळावा व मार्गदर्शन कार्यशाळेचे भव्य आयोजन करण्यात आले. गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस पाटलांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि ग्रामविकास व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते पोलीस पाटलांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विशेष ‘मार्गदर्शन पुस्तिके’चे शानदार अनावरण करण्यात आले.
या कार्यशाळेदरम्यान उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी पोलीस पाटलांना त्यांच्या कर्तव्य आणि अधिकारांबाबत सखोल मार्गदर्शन केले. कायदा व सुव्यवस्था राखताना ग्रामीण भागात पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून पोलीस पाटलांची भूमिका किती मोलाची आहे, यावर वक्त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमात विशेष कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल ३८ उत्कृष्ट पोलीस पाटलांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रील्स आणि फोटोग्राफी स्पर्धे’तील विजेत्यांचाही स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक संदेश पसरवणे आणि पोलिसांचे कार्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी या स्पर्धेतील विजेत्यांच्या कल्पकतेचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले. या उपक्रमामुळे पोलीस दल व नागरिक यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. या मेळाव्याला पोलीस पाटील संघटनेचे विविध पदाधिकारी, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि जिल्हा पोलीस दलातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाच्या या संयुक्त उपक्रमामुळे जिल्ह्यातील पोलीस पाटलांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला.



