Home Cities जळगाव गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा अधिकाऱ्यांची विशेष बैठक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा अधिकाऱ्यांची विशेष बैठक

0
6


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीच्या आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी, ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली. गणपती आगमन व विसर्जन सोहळा उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी महापालिका प्रशासनाने करावयाच्या विविध उपाययोजनांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत महापौर दीपमाला काळे यांनी मनपाच्या मानाच्या गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जन सोहळ्यापर्यंतचे सविस्तर वेळापत्रक उपस्थित अधिकाऱ्यांसमोर मांडले. गणेशोत्सव हा शहरातील नागरिकांसाठी श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचा सण असल्याने महापालिका प्रशासनाने त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहपरिवार सहभागी व्हावे, तसेच पारंपरिक वेशभूषेत उत्सवात उपस्थित राहावे, असे आवाहन महापौरांनी केले. नागरिकांमध्ये सामाजिक विषयांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने आगमन आणि विसर्जन मार्गांची योग्य प्रकारे तयारी करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. या मार्गांवरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

उत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. गर्दीच्या ठिकाणी अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवून वाहतुकीचा मार्ग सुरळीत राहील, याची काळजी घेण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित विभागांना केल्या. आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवर आवश्यक त्या सुविधा आणि व्यवस्थांची पाहणी करून वेळेत कार्यवाही करण्याचेही निर्देश देण्यात आले.

गणेशोत्सव हा सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढविणारा उत्सव असून, सर्व जळगावकरांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी केले. उत्सव साजरा करताना आपापसातील एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त पंकज गोसावी यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता, रस्ते, वाहतूक आणि अन्य आवश्यक व्यवस्थांचा आढावा घेत प्रशासनाकडून तयारीला गती देण्यात येत आहे.


Protected Content

Play sound