


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांना प्रतिष्ठेचा ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला असून, सलग दुसऱ्यांदा हा राष्ट्रीय सन्मान मिळविणाऱ्या त्या ठरल्या आहेत. संसदेतील प्रभावी सहभाग, जनहिताचे प्रश्न सातत्याने मांडणे, विकासकामांसाठी पाठपुरावा आणि लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर खासदार स्मिता वाघ यांनी हा सन्मान केवळ वैयक्तिक गौरव नसून जळगाव लोकसभा मतदारसंघातील जनतेने दाखविलेल्या विश्वासाचा सन्मान असल्याची भावना व्यक्त केली. संसदेत मांडलेले प्रश्न, विकासकामांसाठी केलेल्या मागण्या आणि जनहितासाठी घेतलेले विविध पुढाकार यामागे मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा व समस्या केंद्रस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले.
“गतवर्षी मिळालेल्या पहिल्या ‘संसद रत्न’ सन्मानाने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा दिली. सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या या पुरस्कारामुळे जनतेप्रती असलेली जबाबदारी आणखी वाढली आहे,” असे खासदार स्मिता वाघ यांनी यावेळी सांगितले.
संसदीय कामकाजात सक्रिय सहभाग घेत मतदारसंघातील विविध प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर वाचा फोडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या मूलभूत समस्या, विकासकामे, पायाभूत सुविधा तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या विकासाशी संबंधित विविध मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करण्यास आपण प्राधान्य दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या सन्मानाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे मार्गदर्शन आणि विश्वासाबद्दल आभार मानले. संसद रत्न पुरस्कार समिती, ज्युरी सदस्य, संसदीय सहकारी, भाजप परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्ते, सहकारी आणि शुभेच्छुकांचेही त्यांनी कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले.
‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ प्राप्त झालेल्या सर्व सहकारी खासदारांचे अभिनंदन करताना, जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची प्रेरणा या सन्मानातून मिळत असल्याचे खासदार वाघ यांनी सांगितले. सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या या पुरस्कारामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळातही त्यांच्या संसदीय कामगिरीची चर्चा होत आहे.
दरम्यान, खासदार स्मिता वाघ यांना सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल जळगाव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. हा पुरस्कार जळगाव लोकसभा मतदारसंघासाठीही अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.
संसदेतील प्रभावी कामगिरीची सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेल्याने खासदार स्मिता वाघ यांच्या संसदीय कारकिर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. जनतेचा विश्वास आणि जबाबदारीची जाणीव अधिक बळकट करून आगामी काळातही मतदारसंघातील प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.



