Home क्राईम चोपड्यात कर्कश आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल !

चोपड्यात कर्कश आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल !

0
9


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी चोपडा शहर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. जहरवीर गोगाजी महाराज जन्मोत्सव मिरवणुकीदरम्यान पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मर्यादेपेक्षा अधिक कर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्या चालकाविरुद्ध चोपडा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

६ सप्टेंबर २०२६ रोजी चोपडा शहरात जहरवीर गोगाजी महाराज जन्मोत्सवाची मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. मिरवणुकीपूर्वी पोलिसांनी आयोजक व मंडळांना नोटीस बजावत डीजे अथवा डॉल्बी सिस्टीम निर्धारित ध्वनी मर्यादेपेक्षा अधिक क्षमतेने न वाजवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मात्र, मिरवणुकीदरम्यान रुपम ज्वेलर्स परिसरात मोहिणी डीजे बॅन्डचा मालक सचिन उर्फ पिंटू पंडीत शिरसाठ (वय ३७, रा. पंचशील नगर, चोपडा) हा मोठ्या आणि कर्कश आवाजात डीजे वाजवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला समज देऊनही डीजेचा आवाज कमी न करता तो सुरूच ठेवण्यात आला.

यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष ‘Testo’ कंपनीच्या ध्वनी मापक यंत्राद्वारे आवाजाची तीव्रता तपासली. यावेळी डीजेचा आवाज तब्बल **११५.६ ते १२०.९ डेसिबल** इतका नोंदविण्यात आला. मिरवणूक संपल्यानंतरही डीजे सुरू ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या प्रकरणी सचिन शिरसाठ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), ध्वनी प्रदूषण नियंत्रणासंबंधीचे कायदे तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आगामी सण-उत्सवांच्या काळात मंडळे, आयोजक आणि डीजे चालकांनी ध्वनी प्रदूषणासंबंधीचे नियम काटेकोरपणे पाळावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

सण-उत्सव आनंदात साजरे करताना ध्वनी प्रदूषण टाळून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound