
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील सकल बौद्ध समाजाच्या वतीने शुक्रवारी (४ सप्टेंबर) शहरात हजारोंच्या संख्येने विराट मोर्चा काढण्यात आला. महिला, पुरुष, युवक-युवती तसेच अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने शहरातील वातावरण निळ्या ध्वजांनी आणि घोषणांनी भारून गेले होते. ‘आरक्षण उपवर्गीकरण रद्द करा’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी मोर्चाचा मार्ग दुमदुमून गेला.

कृषी उत्पन्न बाजार समिती, बोदवड रोड येथून दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. बोदवड चौफुली, बसस्थानक मार्गे मोर्चा परिवर्तन चौकात पोहोचला. मोर्चात सहभागी समाजबांधवांनी पांढरे वस्त्र परिधान करून गळ्यात निळे रुमाल आणि हातात निळे ध्वज घेतले होते. त्यामुळे संपूर्ण मोर्चा निळ्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिवर्तन चौकात महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत समाजबांधवांनी त्रिसरण व पंचशील ग्रहण केले. यावेळी सामाजिक एकजूट आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणाचा संदेश देण्यात आला. मोर्चानंतर परिवर्तन चौकात सभेचे आयोजन करण्यात आले. मालेगाव येथून आलेले प्रमुख वक्ते सुनील पवार यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेमुळे अनुसूचित जातींमधील विविध घटकांच्या संविधानिक आरक्षणाच्या हक्कांवर संभाव्य परिणाम होऊ शकतो, तसेच त्याचे सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय परिणाम काय असू शकतात, याबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर युवक-युवतींनी पथनाट्याच्या माध्यमातून आरक्षणाचा प्रश्न, सामाजिक वास्तव आणि संविधानिक हक्कांचा विषय प्रभावीपणे मांडला. पथनाट्यातून मांडण्यात आलेल्या मुद्द्यांना उपस्थित समाजबांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोर्चाच्या वतीने तहसीलदार गिरीश वखारे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ उपस्थित होते. हे निवेदन तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठवून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ स्थगित करून ती रद्द करावी, तसेच उपवर्गीकरणाचा विविध घटकांवर होणारा सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय परिणाम यांचा सखोल अभ्यास करावा, अशी मागणी करण्यात आली. अनुसूचित जातींच्या संविधानिक आरक्षणाच्या हक्काला बाधा येईल, अशी कोणतीही कार्यवाही करू नये, अशीही भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. याशिवाय अनुसूचित जातींच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करावी, नवीन विकासात्मक योजना सुरू कराव्यात, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी वाढवाव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या. युवक, महिला, उद्योजक आणि बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार तसेच उद्योगाच्या विशेष योजना राबविण्याची मागणीही करण्यात आली.
अनुसूचित जातींच्या वस्त्यांमध्ये रस्ते, पाणी, वीज, निवास आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांचा प्राधान्याने विकास करावा, रमाई आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा, तसेच सामाजिक न्याय विभागाचा विकास निधी इतरत्र वळवू नये, अशा विविध मागण्यांचाही निवेदनात समावेश करण्यात आला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चादरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यामुळे मोर्चाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली नाही. त्यामुळे हजारोंच्या सहभागाचा हा मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.



